11.1 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

मुंबई बंगलोर इंडस्ट्रीयल कॉरीडोर चा निर्णय मार्गी लावल्यास कराड एमआयडीसी विकासाला चालना मिळेल

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकट मुलाखतीत मांडले मत; पुण्यातील कराड दक्षिण रहिवाशांसमोर उलघडला जीवन प्रवास.
 कराड:-
मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात औद्योगिक व कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरच्या धर्तीवर सहाय्यक कॉरिडोर विकसित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार होता. जपानच्या सहाय्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रमाणेच कॉरिडोर विकसित करण्यात ब्रिटन सरकारने रस दाखविला होता.सदर औद्योगिक कॉरिडोर आघाडी सरकारच्या काळात कराड व परीसरातील डोंगरी विभागासह माण-खटावच्या दुष्काळी विभागातील युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून फेब्रुवारी २०१३ मध्ये पुणे-बंगलोर महामार्गालगत औद्योगिक कॉरिडोर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा निर्णय महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा हातात घेण्यात आला. त्यानुसार तत्कालीन अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग सुद्धा झाली होती. हा प्रकल्प अत्यंत धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा प्रकल्प होता जो मार्गी लागला असता तर हजारो रोजगार निर्माण झाले असते.  कॉरिडोरचा निर्णय आगामी काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. सद्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात उद्योगस्नेही वातावरण नसून, मागील दहा वर्षात एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. याउलट राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात आले. उद्योग न आल्याने बेरोजगारी वाढली आहे. मुंबई-बंगलोर इंडस्ट्रियल कॉरीडोर चा निर्णय महत्वाकांक्षी असल्याने याचा मोठा फायदा कराडची इंडस्ट्री विकसित करण्यास होईल. कराडनजीक नवीन एमआयडीसी स्थापन करणार असून, आयटी हब बनविण्यासाठी आपले प्राधान्य असेल. अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आकुर्डी – पिंपरी चिंचवड (पुणे) येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात झालेल्या कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशी स्नेहमेळाव्यात एका मुलाखतीत ते बोलत होते. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक समीरण वाळवेकर यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्याने मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. यावेळी माजी सहकार राज्यमंत्री आ. विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात, माजी जि.प सदस्य शंकरराव खबाले, नामदेवराव पाटील, राजेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कराड दक्षिणमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष व्हावा, अशी काहींची इच्छा आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले असून, मतांच्या राजकारणासाठी हे सर्व सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे, असे आवाहन आ. चव्हाण यांनी केले.
तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अविस्मरणीय अशी होती. त्यांच्या रूपाने काँग्रेसला लढवय्या नेता मिळाला. इंडिया आघाडीमुळे मतविभाजन टाळण्यात यश आल्याने लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव करता आला. कराडला नवीन एमआयडीसीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर कराडनजीक आयटी हब उभा करण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
दोन वर्षापूर्वी पर्यायी सरकार स्थापन करून ४० आमदार वेगळे झाले आणि हे बेकायदेशीर सरकार निर्माण झाले. आता भ्रष्ट कारभार जनता पाहत आहे. या भ्रष्ट आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत जाब द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री असताना सदनिका वाटप करताना मी स्वेछिकपणा ठेवला नाही. राज्य शिखर बँकेत गैरप्रकार झाले होते. तेथे मी संचालक मंडळ बरखास्त केले. त्यामुळे ११०० कोटी रुपयेच्या तोट्यात असलेल्या बँकेचा दोन वर्षात तोटा भरून काढत ७०० कोटी रुपयांच्या फायद्यात आणली. सहकार चळवळ वाचविण्याचे हे पहिले पाऊल होते.
नागपूर भागातील गोसी खुर्द प्रकल्प पूर्ण होत नसल्याचे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी त्या खात्याची श्वेतपत्रिका काढली. यामागे माझा तो कोणताही चौकशी लावण्याचा हेतू नव्हता. तर तो राज्यासाठी हिताचा निर्णय होता. परंतु काहींनी याचा राज्यात गैरसमज पसरवला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याची प्रेरणा मला पंतप्रधान कार्यालयात काम केल्यामुळे मिळाली. व मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रश्न हाती घेतला. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यामुळे आम्ही सुरू केलेले काम पूर्ण झाल्याचे मला समाधान आहे.
आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात ही योजना काँग्रेसने सुरू केली. जर ही राज्यात सुरु झाली नसती, तर आमच्या जाहीरनाम्यात ही योजना आली असती असेही त्यांनी नमूद केले. कराड – चिपळूण लोहमार्ग करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना तरतूद केली होती. मात्र २०१४ मध्ये भाजप सरकारने हे पैसे बुलेट ट्रेनकडे वळवले. त्यामुळे कराड – चिपळूण लोहमार्गाचे काम रखडले आहे. येत्या निवडणुकीनंतर आमचेच सरकार येणार असून, कराड – चिपळूण लोहमार्गाचे काम पूर्ण होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या