टाकळी एमआयडीसीला विरोध करत तहसीलदार कार्यालयाचे गेट-काचा फोडल्या
शिरोळ/प्रतिनिधीः-
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याच विरोधात आज शिरोळ शहरातून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चेकर्यांना तहसील कार्यालयात प्रवेश न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी पोलीस आणि मोर्चेकर्यांमध्ये झटापट झाली.
संतप्त मोर्चेकर्यांनी तहसील कार्यालयाचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा आणि काचेचा दरवाजा तोडून थेट कार्यालयात प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं. शिरोळ तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात आता एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, या एमआयडीसीला ग्रामस्थ आणि सैनिकांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा देण्याऐवजी एमआयडीसीच्या माध्यमातून गावची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.याच भूमिकेतून आज शिरोळ शहरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात पोहोचल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकर्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयाचं बाहेरील गेट बंद करण्यात आलं. त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले आणि पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली.याचवेळी संतप्त मोर्चेकर्यांनी लोखंडी ग्रीलचा दरवाजा तोडून तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर मुख्य इमारतीच्या काचेच्या दरवाजाजवळही मोर्चेकरी पोहोचले. पोलिसांनी हा दरवाजा बंद करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त मोर्चेकर्यांनी काचेचा दरवाजाही तोडून थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून मोर्चेकर्यांनी तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावरही गंभीर आरोप करत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर मुर्दाबादच्या घोषणा दिल्या सैनिक टाकळी गावच्या हद्दीतील रिकाम्या जागेत एमआयडीसी आणण्याचा घाट राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीच घातल्याचा आरोप मोर्चेकर्यांनी केला आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्याऐवजी गावात एमआयडीसी उभारून काय साध्य होणार, असा सवालही मोर्चेकर्यांनी उपस्थित केला आहे.
तहसील कार्यालयात प्रवेश केल्यानंतरही सक्षम अधिकार्यांनी मोर्चेकर्यांची थेट भेट घेतली नसल्याने संताप आणखी वाढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकर्यांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून सोडला. सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा इशाराही मोर्चेकर्यांनी दिला दरम्यान दुपारी 4 वाजता शिरोळचे तहसीलदार अनिल होळकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले





