8.3 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोष्ट छोटी, डोंगराएवढी !  

कृष्णाकाठ / दि. १७ फेब्रुवारी २०२५ / अशोक सुतार

गोष्ट छोटी, डोंगराएवढी !  

 

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील कोकणाचा डोंगर , नारायण बुवा खडी परिसरातील डोंगर आगीत भस्मसात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने वडोली निळेश्वर गावाच्या डोंगरावर आग लावल्यामुळे आगीत डोंगरातील सर्व झाडे, गवत भस्मसात झाली. वडोली निळेश्वर गावातील पर्यावरण प्रेमी युवक आणि नागरिकांनी डोंगरातील वणवा विझवण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले. पण आगीची तीव्रता जास्त होती. तरीही युवकांनी शर्तीचे प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. डोंगराला आगी लागण्याचे प्रकार हल्ली जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. यामागे एक अंधश्रद्धा आहे, ती म्हणजे, डोंगराला आग लावली तर गवत जळते आणि पुन्हा नवीन गवत मोठ्या जोमाने उगवते. परंतु डोंगराला आग लावल्यामुळे तसे होत नाही आणि औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती जाळून जातात. शिवाय वन्यप्राणी डोंगरात राहत असल्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे काय ? हा प्रश्न मानवाच्या मनात येत नाही. आपण वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट करत आहोत, भविष्यात जी वनसंपदा धरतीवर फुलून येणार आहे, ती आपण कायमची नष्ट करीत आहोत, याचा पश्चातापही मानवाच्या मनाला स्पर्शून जात नाही, ही गंभीर बाब आहे.

कोकणाचा डोंगर , नारायण बुवा खडी परिसरातील साधारण आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या दरम्यान डोंगर पेटल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले आहे, वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. गावातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशातील जंगलांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जंगलात पुरेसे पाणीसाठे उपलब्ध नसल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येतात. मानवाचा आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष निर्माण होतो. यात वन्यप्राणी किंवा मानवाचे जीवित नुकसान अटळ आहे. प्रत्येक ठिकाणी मानवाच्या चंगळवादासाठी आपण पर्यावरणाचा नाश करतो. वाघांच्या अवयवांची तस्करी होत असल्यामुळे वाघांची शिकार होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अन्यथा वन्यप्राणी दुर्मिळ होतील आणि निसर्गाचा समतोल बिघडेल अशी भीती व्यक्त होत आहे. रस्ते वाहतुकीच्या सोयीसाठी जंगलाचा नाश होत आहे. वणवा पेटवून डोंगरावर पुन्हा नवीन गवत येण्यासाठी डोंगर पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु डोंगर पेटवून वन्यप्राण्यांना त्रास देणे, वृक्षराजी नष्ट करणे, ऑक्सिजन नष्ट करणे, वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट करणे याचा विचार मानव गांभीर्‍याने का करत नाही ?

वडोली निळेश्वर येथील डोंगरावरील आगीची एवढी तीव्रता एवढी होती की, पर्यावरण प्रेमी युवकांनी, वन खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी शर्तीचे प्रयत्न केले. पण थोड्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीची जास्त तीव्रता असल्यामुळे पाच ते सात किलोमीटर डोंगर क्षणात भस्मसात झाला असण्याचा अंदाज आहे. डोंगर पेटवून प्राण्यांचे अस्तित्व नष्ट करून डोंगरावरच्या झाडाझुडपांचे नुकसान करून, ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या झाडांचा नाश करून आपण कोणती मानवी वृत्ती दाखवत आहे ? असा सवाल गावातील पर्यावरण प्रेमी नागरीक व्यक्त करत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, वन खात्याने अशा घटना रोखण्यासाठी एक वेगळी स्पेशल फौज भविष्यात निर्माण करावी. सरकारी नियमाप्रमाणे वणवा पेटवणे कायद्याने गुन्हा आहे. डोंगर पेटल्यावर पुढच्या वर्षी नवीन गवत येथे उगवते, असा गैरसमज आहे. या गैरसमजातून हे कृत्य घडले असावे, अशी शंका कृष्णा बचावचे कार्यकर्ते राहुल पवार यांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणासाठी नदी चळवळीसाठी सक्रीय कार्यकर्ते म्हणून कार्यरत असणारे राहुल पवार यांनी दैनिक  प्रीतिसंगमशी बोलताना म्हटले आहे की, आमच्या गावातील डोंगर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवला. ही बातमी कळताच गावातील पर्यावरण प्रेमी युवकांनी डोंगर विझवण्यासाठी प्रयत्न केले. वन खात्याचे अधिकारीही डोंगर विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु तीव्रता एवढी होती की, क्षणातच डोंगर भस्मसात झाला. डोंगरावर धुराचे लोट दिसत होते. यामुळे मनाला खूप वेदना झाल्या. डोंगर पेटवणार्‍या विकृत मानवी वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशा घटना भविष्यात रोखल्या पाहिजेत, असेही राहुल पवार म्हणाले.

राहुल पवारसारखे पर्यावरण कार्यकर्ते आहेत, म्हणून समाज सुरक्षित आहे. डोंगराला आग लागल्यावर युवकांनी धाव घेऊन वणवा विझवण्याचा प्रयत्न करणे, हे उगाच होत नाही. त्यासाठी पर्यावरणाबद्दल, झाडांबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावे लागते. निसर्गाशी नाळ जोडल्यावर निसर्ग आपल्याला खूप काही भरभरून देतो. निसर्ग मानवाला ऑक्सीजन, जगण्याची प्रेरणा, नवी ऊर्जा देतो. निसर्ग असेल तरच मानवाचे अस्तित्व आहे. अन्यथा, माणूस कमनशिबी आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या