6.5 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

कृष्णाकाठ / date: 17 april 2025/ अशोक सुतार

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातर्फे सभासद नोंदणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी युवकांची रिघ लागली असून पदांकरिता जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. सातारा जिल्हा पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. परंतु २०१४ साली केंद्रात मोदी लाट आली आणि अनेक पक्षांमध्ये विस्कळीतपणा आला. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. यशवंतराव मोहिते, स्व. बाळासाहेब देसाई, स्व. प्रेमलाताई चव्हाण, स्व. शंकरराव जगताप, स्व. पी. डी. पाटील, स्व. किसन वीर, स्व. लक्ष्मण तात्या पाटील, प्रतापराव देशमुख, स्व. विलासकाका पाटील उंडाळकर असे अनेक नेते सातारा जिल्ह्यातून काँग्रेसमध्ये होते. स्व. यशवंतराव चव्हाण हे भारताचे उप पंतप्रधान होते, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. अशा अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले. आता मात्र सातारा जिल्ह्यात सर्वत्र कमळ फुलल्याचे दिसून येत आहे.
भाजपची आढावा बैठक नुकतीच सातारा येथे पार पडली. या बैठकीप्रसंगी खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात आता लवकरच मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपद बदलाचे वारे सुरू झाले आहे. यासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रमुख दावेदारांनी पदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. २०१४ पासून सातारा जिल्ह्यातील राजकारणाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम काँग्रेसला कुणी राजकीय धक्का दिला असेल तर शरद पवारांचे नाव समोर येते. शरद पवार सातारा जिल्ह्यातील नेते नसले तरी, काँग्रेस सोडल्यानंतर शरद पवारांनी स्वत: चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि सातारा जिल्ह्यात अनेकांनी काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्व कमी करण्यासाठी बारामतीचे पवार जबाबदार होते. नंतर मोदी लाटेत या पक्षातील काहीजण अन्य पक्षांत चालते झाले. परिणामी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला ग्रहण लागले.
सातारा जिल्ह्यात आज भाजपचे जोरदार वारे वहात असून इतर राजकीय पक्ष शांत बसले आहेत. ज्या सातारा जिल्ह्यात पुरोगामीत्वाची चर्चा केली जायची, त्या जिल्ह्यात आता भगवे विचार, हिंदुत्ववादी विचार, कट्टर मुस्लीम विरोध सुरू झाला आहे. धर्मावरुन सर्वत्र दंगली, दंगे होत असताना सातारा चिडिचूप असायचा. पण त्याच सातारा जिल्ह्यात पुसेसावळी परिसरात तीन वर्षांपूर्वी हिंदू- मुस्लिम तणाव निर्माण झाला होता. म्हणजे, कोणता राजकीय पक्ष सत्तेवर आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते असे म्हणायला हरकत नाही. सातारा जिल्ह्यात भाजपा पक्षातील जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, भाजप पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, साताराचे माजी शहराध्यक्ष विकास गोसावी यांची नावे आघाडीवर आहेत. सातारा जिल्ह्यात कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले,कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माण येथील आमदार जयकुमार गोरे आणि साताराचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असे एकूण चार आमदार आहेत. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत. म्हणजेच सातारा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपा प्रवेशाला मोठे महत्व आले आहे.
जि. प. चे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना रणजित फाळके यांनी जिल्ह्यासह राज्यपातळीवर पक्षाची बांधणी उत्तम पध्दतीने केली आहे. जयकुमार शिंदे यांनी माढा लोकसभा व फलटण विधानसभा मतदारसंघात भाजपची चांगली बांधणी केली आहे. रामकृष्ण वेताळ हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी दावेदार होते, त्यांनीही भाजपासाठी चांगले काम केले आहे. ते भाजपचे कट्टर नेते आहेत. सातारा शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना विकास गोसावी यांनी भाजपचे मूळ प्रवाहातील कार्यकर्ते आणि नव्याने येणार्‍या कार्यकर्त्यांची चांगली सांगड घातली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच सभासद नोंदणीच्या कार्यातही त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. त्यामुळे हे पाचही पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार ठरले आहेत. या पाच दावेदारांपैकी योग्य उमेदवाराची निवड भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी होऊ शकते.
भाजपा जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आमदार, खासदार यांच्या पाठिंब्याचे पाठबळ लागू शकते. त्यामुळे पक्षात कुणाचा संपर्क अधिक आहे, कुणाचे वजन किती आहे यावर ते अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मंत्रिपद वाटपाचा कार्यक्रम पार पडताच भाजपने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम देशभर हाती घेतला होता. सातारा जिल्ह्यातून सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाने जिल्ह्यामधील मंडलांची संख्याही वाढवलेली आहे. ज्या ठिकाणी एक मंडल होते, तिथे आता दोन मंडलांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन शहराध्यक्ष पहायला मिळतील. शहराध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. सध्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे पक्षाच्यावतीने कोणती जबाबदारी दिली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी उमेदवारांची रस्सीखेच सुरू राहणार आहे. सातारा जिल्ह्याला प्रभावी जिल्ह्याध्यक्ष हवा आहे. परंतु ज्याचे जास्त राजकीय वजन त्याचाच प्रभाव अधिक पडणार हे निश्चित !

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या