spot_img
spot_img
spot_img
spot_img

दिवाळीच्या साहित्यांनी कराडची बाजारपेठ फुलली..

खरेदीसाठी लगबग;आकाशकंदील,पणत्या,रांगोळी साहित्यासाठी ग्राहकांची झुंबड

कराड/प्रतिनिधी:-
आंधारातून प्रकाशाकडे नेणारा आनंदाचा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कराडची बाजारपेठ सध्या दिवाळीच्या उत्सवी सजावटीत न्हाऊन निघाली आहे. दत्त चौक ते चावडी चौक, तसेच चावडी चौक ते पांढरीचा मारुती मंदिर या परिसरात दिवाळी साहित्यासाठी उभारलेल्या रंगीबेरंगी स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
रंगीबेरंगी आकाशकंदील, पारंपरिक मातीच्या पणत्या, आकर्षक चायनीज पणत्या, तोरणे, रांगोळी, झाडू, किल्ले आणि सैनिकांच्या मूर्ती असे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. 10 रुपयांपासून 700-800 रुपयांपर्यंतच्या दरात आकाशकंदीलांची विक्री सुरू असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत आहे.
दिवाळी म्हटले की नवीन कपडे आणि फराळ यांशिवाय सण अपुरा. त्यामुळे कराडची कपड्यांची दुकानेही झगमगली आहेत. रेडिमेड कपडे, साड्या आणि मुलांसाठी आकर्षक पोशाख खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तसेच लाडू, चिवडा, करंजी यांसारख्या फराळासाठी लागणार्‍या साहित्याची खरेदीही जोमात सुरू आहे. किरणा दुकानदारांकडे तेल, रवा, साखर, खोबरे, सुके मेवे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
शुक्रवार, दि. 17 ऑक्टोबरपासून वसुबारसेने दिवाळी सणाला प्रारंभ होणार आहे. दिवाळी मोठी नाही, आनंदाला तोटा नाही या उक्तीप्रमाणे सर्व समाजघटक या सणाची आतुरतेने तयारी करत आहेत. शहरातील प्रत्येक गल्ली आणि दुकानातून सध्या फुलांच्या सुगंधासोबत दिवाळीचा आनंद दरवळत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या