spot_img
spot_img
spot_img
spot_img

सांगलीत आज दहा पं. स. सभापती, उपसभापतींच्या निवडी 

जि.प.अध्यक्ष आमचाच म्हणणाऱ्या भाजपला एक सभापतीपद मिळवताना नाकेनऊ
 
सांगली / भूषण मांजरेकर 
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या निवडींसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला आहे. मंगळवार, दि. १० मार्च रोजी विशेष सभा घेऊन या निवडी होणार असून, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होणार असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रत्येक दौऱ्यात छाती बडवून सांगत आहेत. वास्तविक, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट जिल्हा परिषदेत भाजप बरोबर जाण्यास तयार नाही. दहा पंचायत समितीपैकी एक पंचायत समितीचा सभापती मिळवताना भाजपला नाकेनऊ आले आहे.
निवडणुकीनंतर रखडलेल्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आल्यानंतर पक्षीय नेत्यांत सत्ता स्थापनेच्या शर्यतीला चांगलीच गती मिळाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडून जवळपास एक महिन्याचा कालावधी होत आला असतानाही अध्यक्ष व सभापती निवडी रखडल्या होत्या. दरम्यान ग्रामविकास विभागाने निवडणुका झालेल्या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दि. २० मार्चपूर्वी या निवडी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पंचायत समिती सभापती निवडी निश्चित केल्या आहेत. सभापती निवडीनंतर आठवडाभरातच जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका दि. ९ फेब्रुवारीला पार पडल्या होत्या. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह दहा पंचायत समित्यांचा समावेश होता. ग्राम विकास विभागाच्या पत्रानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलली असून, दि. १० मार्चच्या विशेष सभांमध्ये सभापती व उपसभापतींची निवड होईल.
जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्ये विविध पक्षांना सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे. यात काँग्रेसला दोन, शिवसेना (शिंदे गट) ला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला दोन पंचायत समित्यांमध्ये सत्ताधारी होण्याची शक्यता आहे. तर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता मिळेल. शिराळा पंचायत समितीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र सत्ता सांभाळणार असून, मिरजेत भाजप-शिवसेना युती सत्ताधारी होण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीचे सभापतीपद मिळवण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुप्त चर्चा जोरात सुरु आहेत. अध्यक्ष सभापती निवडीबाबतचे पत्र आल्यानंतर सर्वच पक्षांत हालचालींना गती मिळाली आहे. उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी पक्षीय बैठका वाढल्या आहेत. या निवडींमुळे ग्रामीण विकासाच्या निर्णय प्रक्रियेला गती येईल आणि स्थानिक मुद्यांवर प्रभावी कारभार होण्याची अपेक्षा आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या