spot_img
spot_img
spot_img
spot_img

तरूणांच्या प्रमाणे शेतकरीही रस्त्यावर उतरतील

सरकारने शेतकर्‍यांची चेष्टा लावली आहे का?

कराड/प्रतिनिधी:-
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा आणि पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देत ज्याप्रमाणे तरूण जागा झाला आणि रस्त्यावर उतरला त्याचप्रमाणे आता शेतकरीही जागे होतील आणि रस्त्यावर उपरतील असा दावा ही त्यांनी केला. सरकारने शेतकर्‍यांची पाच हजाराची मदत देवून चेष्टा लावली आहे का? असा सवाल त्यांनी केला.
दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, आगामी काळात पाऊस पडेल की नाही, याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठातील प्राचार्य यांनी त्यांच्या कडे जी जमीन आहे तिथे चारा उत्पादनासंदर्भातील प्रस्ताव शासनाला दिला आहे. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिल्यास, चारा उत्पादन होऊ शकते ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना चारा उत्पादन करता येईल. त्यामुळे शासनाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.
सध्या सरकारने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे यासाठी पाणीसाठा राखून ठेवला आहे. अशा परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देणे आणि शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. केवळ नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर टीका करताना चव्हाण म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. कुंभमेळ्यासाठीही हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांवरही प्रचंड खर्च केला जात आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळाचा सामना करणार्‍या गरीब शेतकर्‍यांना पुरेशी मदत मिळत नसेल, तर सरकारच्या प्राधान्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
शेतकर्‍यांना नेमके काय हवे आहे, याचा विचार सरकारने करावा, असे आवाहन करत ते म्हणाले की, गरीब शेतकर्‍याला विचारले तर त्याला मोठे प्रकल्प किंवा इतर भव्य आयोजनांपेक्षा आपल्या शेतीसाठी, जनावरांच्या चार्‍यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदत हवी असल्याचे तो सांगेल. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याची भूमिका घ्यावी.
मोठ्या सरकारी योजनांमधील खर्च आणि कथित कमिशनच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विविध प्रकल्पांवर होणार्‍या खर्चातून शेतकर्‍यांना प्रत्यक्ष काय लाभ मिळतो, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चारा, पाणी आणि आर्थिक मदतीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही, तर काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या हक्कासाठी व्यापक आंदोलन उभारेल, असा इशाराही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.ज्या प्रमाणे युवक स्वतः च्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले त्या प्रमाणे एक दिवस शेतकरी ही रस्तावर उतरतील.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या