तुकोबा-ज्ञानोबाच्या जयघोषाने दुमदुमली इंदापूर नगरी..
जितेंद्र जाधव
इंदापूर:-
दि.१० रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव-केतकी येथील मुक्काम नंतर इंदापूर मध्ये दाखल झाली. पालखी इंदापूर शहरात दाखल होताच इंदापूर शहरवासीयांकडून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे व सर्वात मोठे अश्वरिंगण इंदापूर शहरातील कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर पार पडले. यावेळी नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात!! अशा भावना अश्व रिंगणाचा सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात होत्या.
टाळ मृदूंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात लहान थोरांनी मोठ्या उत्साहाने या रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला, यावेळी झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी आणि विणेकरी यांनी मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या घेतल्या. या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील अनेक ग्रामस्थांनी देखील हजेरी लावली होती,
या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडल.निमगाव-केतकी येथील मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे अश्व रिंगणासाठी इंदापूर मध्ये ज्ञानोबा-तुकोबा च्या जयघोषात आगमन झाले, काल सकाळ पासून रिंगण स्थळावर वारकरी संप्रदायातील भाविकांनी, इंदापूर सह पंचक्रोशीतील सर्व विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल वृद्धांचे भान हरपले. देहभान हरपून विठुनामाचा ज-प करीत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांनी पहिले रिंगण केले. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि अश्वांच्या चरणाखालील रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली.इंदापूर मध्ये तुकारामाच्या पालखीचा एक मुक्काम आहे. या रिंगण सोहळ्यादरम्यान महिला आणि पुरुषांनी देखील फुगड्यांचा फेर धरले. यावेळी कुणी टाळ, मृदुंग आणि विणेच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला होता.
संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ इंदापूर मध्ये दाखल होताच त्या रथाचे सारथ्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना माजी खा. राहुल शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर नगरपालिकेचे आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.