पाटण–
पाटण विधानसभा मतदार संघात विकास कामात झालेली निकृष्टता व भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी पाटण तहसिल कार्यालयावर काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याच वेळेला प्रतिमोर्चा काढला. नवीन एसटी स्टॅण्ड समोर जमलेल्या दोन्ही गटाच्या जमावामुळे याठिकाणी काही काळ तनाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्ती करुन दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चेकऱ्यांनी पोलिसांची मध्यस्थी झुगारुन मोर्चा मार्गस्थी केला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने जमलेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पाटण तालुक्यात शिवसेना ताकदीने उभी असल्याचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवून दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली नवीन एसटी स्टँड समोरून झेंडा चौकात आल्यानंतर याठिकाणी रस्त्यात ठाण मांडून काही काळ कार्यकर्त्यांनी ठिय्या धरला. पोलिसांनी दबावाखाली येऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या आडवल्या आहेत. जोपर्यंत कार्यकर्त्यांना मोर्चा पर्यंत पोहचू दिले जात नाही तो पर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाही. असा पवित्रा हर्षद कदम यांनी घेतला. तनाव वाढत जात असताना कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा लायब्ररी चौक पाटण येथे आल्यानंतर तहसिलदार अनंत गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी हर्षद कदम बोलताना म्हणाले लोकशाही मार्गाने चाललेल्या मोर्चाला पोलिसांचे बळ व पोसलेल्या ठेकेदारांकडून चिरडण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला आहे. मोर्चाच्या पाठीमागून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. यावरुन पालकमंत्र्यांकडील संवेदनशीलता पूर्ण संपलेली आहे असे दिसते. मतदार संघात झालेल्या निकृष्ट कामावर ठिक ठिकाणी केलेल्या उद्घाटनाच्या कामावर पालकमंत्री बोलायला तयार नाहीत. प्रश्न पालकमंत्र्यांना विचारायचे नाहीत तर विचरायचे कोणाला..? मोठ मन दाखवून चुका मान्य करा.. तुमच्या चुका नाहीत तर केलेल्या कामांच्या चौकशीसाठी कार्यकर्त्यांच्या टिमा करुण गावोगावी का फिरायला लावल्या आहेत.? पंधरा दिवसांनी निवडणूकीची आचारसंहिता लागेल परत सत्तेचा सारिपाठ जनतेच्या हातात जाणार आहे. पाटण तालुक्यातील जनता सूज्ञ आहे. असे सांगत पाटण तालुक्यात लोकशाहीच राहिलेली नाही. सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकून हुकूमशाही अवलंबली जात आहे. अशा हुकूमशाहीला निष्ठावंत शिवसैनिक भिक घालणार नाही असे हर्षद कदम यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी पाटण तालुका प्रमुख सुरेश (नाना) पाटील, उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील, उपतालुकाप्रमुख भरत पवार, पाटण शहर प्रमुख शंकराव कुंभार यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.