15.1 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

बंडखोरीला साथ देणारे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या यादीत समावेश

सातारा/प्रतिनिधीः-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बंडखोरीत साथ दिलेल्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाने पाटण विधानसभा मतदार संघातून शंभूराज देसाई व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश शिंदे यांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील या विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. आज यांची उमेदवारी जाहीर झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडखोरी मध्ये साथ दिलेल्या कोरेगाव खटावचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांची ही दुसरी निवडणूक आहे. ते मूळ भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र मतदारसंघ विभागणीत कोरेगाव मतदार संघ शिवसेनेला गेल्यामुळे त्यावेळी एकत्रित शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि कोरेगावची उमेदवारी मिळवली. त्यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही ही चांगलेच संबंध होते. दुष्काळी भागाच्या दौर्‍यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चाही केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीत आमदार महेश शिंदे यांनी त्यांना साथ दिली होती. त्यांच्याबरोबर ते गुवाहाटी येथे गेले होते. त्याचे बक्षीस म्हणून मतदारसंघ विकासात मोठा निधीही मिळाला. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यांनी मागील पाच वर्षांमध्ये मतदार संघात स्वतःची गट बांधणी केली आहे. मतदारसंघात रस्ते, मुख्यतः पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आणि कोरेगाव शहरात त्यांनी मोठी विकास कामे केली आहेत. गाववार जनसंपर्क आहे. सध्या ते कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. या माध्यमातून त्यांनी कोरेगाव आणि खटाव मतदारसंघात दुष्काळी भागात पाणी पोहोचविले आहे. त्यांची थेट लढत विद्यमान विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी पुन्हा होणार आहे.
शरद पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीत त्यांना साथ दिली. मतदारसंघातील व साखर कारखान्याच्या अडचणींसाठी उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे त्यांनी मतदारसंघात सर्वत्र सांगितले होते. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्यासाठी 467 कोटी रुपयांची थकहमीतून विकास कामांसाठी मोठी मदत केली. आमदार मकरंद पाटील हे मागील तीन वेळा आमदार असून चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. महाबळेश्वर या पर्यटन,वाई तीर्थक्षेत्र आणि खंडाळा या दुष्काळी भागात त्यांनी रस्ते पाणी प्रश्न आणि समाजासाठी मोठी कामे केली आहेत. खंडाळा, शिरवळ, लोणंद येथील औद्योगीकरणासाठी आणि औद्योगिक शांततेसाठी ते सतत आग्रही राहिले आहेत. मतदारसंघात त्यांचा दुर्गम कांदाटी खोर्‍यापासून, वाडी वस्तीवर, गाववार थेट जनसंपर्क आहे आहे. त्यांचा राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. अद्याप त्यांच्या विरोधात कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. वाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समोर समोर लढत होण्याची शक्यता आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या