0.2 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

छावा चित्रपटानिमित्त…

कृष्णाकाठ / २८ जानेवारी २०२५ / अशोक सुतार

छावा चित्रपटानिमित्त…

 

छावा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला आहे. चित्रपटातील लेझिम खेळण्याचे दृश्य आहे, त्यावर अनेकांचा आक्षेप आहे. चित्रपटातील वादग्रस्त सीन आता काढून टाकण्यात आला आहे. परंतु स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचे खरे चरित्र लोकांसमोर येण्यासाठी छावा हा चित्रपट सर्वप्रथम इतिहास तज्ज्ञ व जाणकारांना दाखवावा आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे वाटते. छत्रपती संभाजी महाराजांवरील चित्रपट वास्तववादी वाटला पाहिजे हीच जनतेची अपेक्षा आहे.
——————————————————————————————-
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी संघर्ष करून रयतेला सुखी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रावर अनेक उपकार आहेत. त्यांचे ऋण कुणीही विसरू शकत नाही. त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वराज्य राखण्याचे प्रयत्न केले. हे करत असताना फंदफितुरीने त्यांचा घात केला आणि ते औरंगजेबाच्या तावडीत सापडले. औरंगजेबाने त्यांचे हाल केले. अखेर संभाजी महाराज धैर्याने मृत्यूला सामोरे गेले. छत्रपती संभाजी महाराज शूर, हुशार, धैर्यवान होते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच नाटक, चित्रपटांतून त्यांचे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे. आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपटातील काही दृश्ये वास्तववादी वाटत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र उलगडताना चित्रपट कसा बनवावा, याची काळजी या चित्रपटाची कथा किंवा चित्रण केले गेलेले नाही असे वाटते. या चित्रपटातील लेझीम नृत्यावरून वाद निर्माण झाला आहे.

छावा चित्रपट सध्या वादग्रस्त गोष्टींमुळे सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रसिकांना आवडला आहे, सर्वांनीच भरभरून कौतुक केले आहे. पण, या मधील नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपटातले काही संवाद देखील नेटकर्यांना खटकले आहेत. या चित्रपटाद्वारे कला स्वातंत्र्याचा म्हणजेच सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका रसिकांनी केली आहे. चित्रपतातील काही दृश्यांवर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही केले होते. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली गेली.

माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी चित्रपटातील लेझीम नृत्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्याचवेळी त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुकही केले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर मोठे बजेट असेलला चित्रपट काढला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो, असेही ते म्हणाले. माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे की, छावा या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकर्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला. परंतु चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला. नेटकर्यांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला आगामी छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाणार होता. पण, रिलीजपूर्वीच चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकल्यामुळे आता चित्रपटाची रिलीज डेटही पुढे जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या लेझीम खेळणार्या सीनवरुन वाद सुरू होता, त्यामुळे तो सीन काढून टाकला आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी म्हटले आहे की, आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष संशोधन करीत आहे. संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावे, ती व्यक्ती काय होती, किती प्रचंड मोठा योद्धा होता, राजा होता… हे संपूर्ण जगाला कळावे, असा हेतू होता. वादग्रस्त काही गोष्टी आम्ही काढून टाकणार आहोत.

मराठा राजा छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान दुखावला जाऊ नये म्हणून हा चित्रपट आधी तज्ज्ञांना दाखवावा, अशी विनंती महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. छावा हा चित्रपट शिवाजी सामंतांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे. यासाठी छावा कादंबरीचे ऑफिशिअल राईट्स विकत घेतले आहेत. छावा चित्रपटाचे बजेट १३० करोडचे असून चित्रपटात विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांची महत्वाची भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स निर्मित, छावा हा एक पीरियड ड्रामा आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक कथा दर्शवितो. या चित्रपटात १६८१ मध्ये झालेल्या राज्याभिषेकापासून सुरू झालेल्या धाडसी मराठा शासकाच्या गौरवशाली कारकिर्दीचे चित्रण केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या