लोणावळा येथील ‘बँको ब्लू रीबन २०२४’ कार्यक्रमात गौरव
कराड-प्रतिनिधी : –
दि. कराड अर्बन बँकेला सहकार क्षेत्रातील सन्मानाचा ‘बेस्ट टर्नअराऊंड बँक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बँकोच्या वतीने सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरी, तसेच सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्कया रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या बँकांनी बदलत्या नियमांचे पालन करीत आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा केली आहे, अशा बँकांना पुरस्कार दिला जातो. त्यानुसार यावर्षीचा पुरस्कार कराड अर्बन बँकेला जाहीर झाला.
या पुरस्कारामुळे कराड अर्बन बँकेच्या १०८ वर्षांच्या वाटचालीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकोच्या वतीने अॅम्बे व्हॅली, लोणावळा येथे ‘बँको ब्लू रीबन २०२४’ या कार्यक्रमात बँकेला सदरचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
बँकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, ट्रेझरी विभागाचे महाव्यवस्थापक सलीम शेख, कर्ज विभागाचे महाव्यवस्थापक गिरीश सिंहासने, हिशेब विभागाचे महाव्यवस्थापक सीए धनंजय शिंगटे, उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे, सहाय्यक महाव्यवस्थापक संतोष गायकवाड व व्यवस्थापक संदीप पवार यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्काराबद्दल बँकेचे सभासद व ग्राहक यांनी बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांचे विविध माध्यमांद्वारे अभिनंदन केले.