पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा निर्णय; आ. मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश
कराड/प्रतिनिधी : –
पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा देवस्थास ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. परंतु, भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ब वर्ग पर्यटन व्हावे, यासाठी कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आ. मनोज घोरपडे व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पाली गावास ब वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून तत्वता मान्यता देण्यात आली आहे.
कराड तालुक्यातील पाल हे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविकाच्या मध्ये यात्रा होत असते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु, त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतो. पाल देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त असल्यामुळे देवस्थानाचा विकास करण्यासाठी निधी मिळतो. परंतु, गावातील विकासासाठी निधी मिळत नाही. यासाठी पाल गावचा ब वर्ग पर्यटनामध्ये समावेश व्हावा, अशी मागणी कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांनी पर्यटन विभागाकडे केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात सदर बैठक झाली. यामध्ये पर्यटन मंत्री ना. देसाई यांनी पाल गावास तत्वतः ब वर्ग पर्यटनाचा दर्जा जाहीर केला असून एक महिन्याच्या आत शासनदरबारी प्रस्ताव पाठवून पूर्णतः पर्यटनाचा दर्जा देण्याचे मान्य केले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक धार्मिक पर्यटन विकासाच्या अंतर्गत विकास आराखडा तयार करून लवकरच पाली गावचा कायापालट करणार असल्याचे आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले आहे. संपूर्ण पाली गावचा विकास आराखडा तयार करून पाल गाव हे रोल मॉडेल म्हणून विकसित करणार आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकास सर्व मूलभूत सुख सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त भाविक याठिकाणी येऊन पर्यटनास चालना मिळेल. ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासन यांचा सुद्धा महसूल वाढण्यास मदत होईल.
या बैठकीस संग्राम घोरपडे, हिरामणी साहेब, प्रधान सचिव पर्यटन विभाग, व्यवस्थापकीय संचालक पर्यटन विभाग, संचालक पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी सातारा, उपसचिव सांस्कृतिक विभाग, उपसंचालक प्रादेशिक पर्यटन अधिकारी, आधी प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.