जिल्हाधिकार्यांनी केली कामाची पाहणीःआ.बाळासाहेब पाटील यांनी केल्या सूचना
कराड/प्रतिनिधीः-
कराड शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नदीतील पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी बुधवारी कराडला भेट देऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर अधिकार्यांकडून घेतलेल्या माहितीनंतर सध्या 125 हाऊसपॉवर पंपाद्वारे असून सुरु आणखी 125 हाऊसपॉवर पंपाद्वारे पाणी उपसा करून नागरिकांना संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. दरम्यान संध्याकाळी कराड शहराला पाणी पुरवठा करण्यात आला.
येथील निकामी झालेल्या पाईपलाईनच्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सुरु असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी म्हणाले, दोन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाइपलाइन तात्काळ सुरू करणे गरजेचे होते. यासाठी जुन्या पंपहाऊसमधून 125 हाऊसपॉवर पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असून आणखी 125 हाऊसपॉवर पंपाद्वारे पाणीउपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच ज्याठिकाणी पाणी पोचणार नाही, त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच नगरपालिका अधिकारी, महामार्ग देखबल दुरुस्ती विभाग आणि महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांशी नवीन फुलावरून पाइपलाइन टाकण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली आहे. यानुसार पुलाची भार वाहन क्षमता पाहून नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीनुसार निघालेल्या कमी वजनाच्या पाइप टाकून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रयत्न केले जाणार आहेत. या कामासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पृथ्वीराजबाबांची हालचाल..जिल्हाधिकारी कराडात
कराडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तातडीने आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देवून पालिकेचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे अधिकारी तसेच, नॅश्नल हायवेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून सुचना केल्या, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व दुपारी जिल्हानियोजन बैठकित हा विषय एैरणीवर आणून जिल्हाधिकार्यांना झालेल्या परिस्थितीची पाहणीकरून निर्णय घेण्यास सांगितले. तातडीने जिल्हाधिकारी या ठिकाणी आले आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली झाल्या यावरूनच पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशासनावरील पकड स्पष्ट झाली.
आता एकवेळच पाणी
कराडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेल्याने, निर्माण झालेला पाणी प्रश्न तीन दिवसानंतर सोडवण्यात पालिकेच्या प्रशासनाला यश आले. गेली तीन दिवस पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगरअभियंता आ.डी.गायकवाड, अभियंता ए.आर.पवार यांच्यासह पालिकेचे कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडे जुना जॉकवेलवरून पाणीपुरवठा सुरू केला. दरम्यान जोपर्यंत पहिल्या पाईपलाईनचे काम पुर्ण होणार नाही, तोपर्यंत कराड शहरातील नागरीकांना एकच वेळ सकाळी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याची नोंद नागरीकांनी घ्यावी व सहकार्य करावे असे पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी आवाहन केले आहे.