सातारा
दरवर्षी आषाढ महिन्यातील मूळ नक्षत्रावर साजरा होणाऱ्या बैल बेंदूर सणाचा उत्साह यावर्षी काही औरच होता. दरवर्षी हा सण भर पावसात साजरा केला जातो याही वर्षी संततधार पावसाने या सणाचा उत्साह मात्र काही कमी झाल्याचे दिसून येत नव्हते. सातारा शहरातील समर्थ मंदिर रोडवरील माने परिवाराने आपल्या घरातील सर्व बैल जोड्या सकाळीच नाऊ माखू घातल्या त्यांना विविध रंगांनी सजवले .त्यांच्या शिंगांना मोरपिसे ,बेगड, जुली घातल्या ,फुलांचे हार घातले आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत त्यांना गोडधोड खाऊ घालून सायंकाळी सहा वाजता भर पावसात या सर्जा -राजा आणि ढवळ्या- पवळ्या बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलांपेक्षा यात सहभागी झालेल्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साहच अधिक दांडगा होता. तो म्हणजे या मिरवणुकीसाठी आणलेल्या दणदणाटात डॉल्बी सिस्टीमचा विविध रंगांची नकाशी ,लेझर लाईट मधून उतरून मधूनच उडणारे धुराचे फवारे आणि त्यात विविध भाषेतील गाण्यांवर फरकणारी पावले खऱ्या अर्थाने या बैल जोड्यांना मात्र बुजवतच होती .
आपल्या सणाला ही सर्व युवामंडळी नाचून धमाल करत आहेत. मात्र या दणदणाटात आणि कर्कश्य आवाजाने आमची मात्र गाळण उडत असल्याची मनोभावनात हे बैल व्यक्त करताना दिसत होते .हातात वेसण ठरलेल्या आणि या बैलजोड्यांना सावरणाऱ्या माने परिवारातील सदस्यांना मात्र या मिरवणुकीत दणदणाटा मुळे अक्षरशः नाकीनऊ येत होते .त्यातच परिसरातील अनेक सातारकरांनी या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य घालून त्यांची मनोभावे पूजा करत वृषभ देवाची ही अनोखी पूजा आणि मिरवणूक आपल्या घरापुढून जात असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला मिरवणूक सुरू होताना ही डॉल्बीतली दणदणाटाची मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील सुमारे हजारांहून जास्तच युवा मंडळी या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी परिसरात जमा झाल्याचे चित्र होते.
समर्थ मंदिर रोडवरून निघालेली ही मिरवणूक वाजत, गाजत रात्री उशिरा राजवाडा मार्गे मोती चौक, देवी चौकातून पुन्हा घराकडे परत आल्यावर या बैल जोड्यांचे घरच्या सुवासिनीने औक्षण करून हा बेंदराचा सण मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला .