जिल्हात 2 लाख 84 हजार 218 ऑनलाईन फॉर्म नोंदणी
सातारा:
महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत दोन लाख 84 हजार 218 फॉर्म ची नोंदणी करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
या योजनेसाठी घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीपर्यंत यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
ऑनलाइन फॉर्म नोंदणीमध्ये सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर, कोल्हापूर जिल्हा दोन लाख 55 हजार 14 ऑनलाइन फॉर्मची नोंदणी करून द्वितीय क्रमांकवर तर पुणे जिल्हा एक लाख 72 हजार 635 ऑनलाइन फॉर्मची नोंदणी करून तृतीय क्रमांकावर आहे.