कोयना धरणातून 21 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
पाटण:-
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार होत असलेल्या पावसाने प्रती सेकंद 85 हजार 937 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. हा पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने काल गुरवारी सायंकाळी 4 वा. धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे दिड फुटाने उघडून नदीपात्रात 10 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पाण्याची आवक वाढत असल्याने 7 वा. सहा वक्र दरवाजे 3 फुटांवर उघडून 20 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोयना नदीत पाण्याची आवक वाढली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काळात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढते राहिल्यास परिस्थिती नुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. कोयना नदीला निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदी काठावरील सांगली, कराड, पाटण शहरासह आदी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुधवारी रात्रभर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. धरणाचा पाणीसाठा एका रात्रीत 5 टिएमसी ने वाढला. तर गेल्या 24 तासात 8 टिएमसीने वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सायंकाळी 5 ते गुरवारी सायंकाळी 5 या 24 तासात झालेल्या पावसामध्ये कोयना येथे 253 मि.मी. नवजा येथे 307 मि.मी. महाबळेश्वर येथे 384 मि.मी. नोंद झाली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढून गुरवारी सायंकाळ पर्यंत 78.29 टिएमसी पर्यंत आली आहे. पुढील काळात संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी धरण पायथा विद्युत गृहामधील 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता. आता वरील सहा वक्र दरवाजातून सोडण्यात येत असलेले 20 हजार क्युसेक्ससह कोयना नदीपात्रात एकूण 21,050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीला निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे नदी काठावरील सांगली, कराड, पाटण शहरासह आदी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी. व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. * सांगली, कराड, पाटण वासियांनो सावधान..