कराड :
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी लढा उभारला असे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिले असल्याने ही भेट चर्चेची मानली जात आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जो स्वाभिमानी लढा उभारला आहे त्याची इतिहासात तोड नाही. समाजासाठी इतकं निस्वार्थीपणे आंदोलन करून भूमिका घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज कायम सोबत राहील.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाला सर्वात पहिल्यांदा 50% आरक्षण हे छत्रपती शाहू महाराज यांनी दिले होते. त्यानंतर आमच्या आघाडी सरकारने मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बापट यांना विनंती केली होती परंतु त्यांनी मराठा समाजाला आरक्षण ची गरज नाही असं स्पष्ट सांगून आकडेवारी देण्यास नकार दिला त्यामुळे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून वर्षभरात कागदपत्रे गोळा करून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीं मध्ये 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत अध्यादेश काढण्यात आला ज्याचा फायदा हजारो मराठा समाजातील युवकांना होत होता. पण कुणीतरी हे आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल करून मराठा समाजाच्या तरुणांना मिळत असलेला फायदा थांबवला. पुढे फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी 2018 साली आरक्षण देण्याचा आव आणला पण ते फसवे आरक्षण होते. त्यामुळेच ते टिकले नाही कारण आरक्षण देण्याचा अधिकार राज्याकडून 2018 च्या सुरवातीलाच केंद्र सरकारने 102 वी घटना दुरुस्ती करून काढून टाकला होता.
हिवाळी अधिवेशन मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण बाबत माहितीपूर्ण भाषण करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन पहिल्यांदा 2014 साली कशाप्रकारे आरक्षण दिले याची माहिती दिली होती. तसेच मराठा आरक्षण व संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणारे मंत्री छगन भुजबळ जी भूमिका मांडत होते त्यावर पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांनी भुजबळ यांना सुनावत भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
आज अंतरवाली सराटी येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन जवळपास एक तास चर्चा केली.