पांचगणी/प्रतिनिधीः-
पुस्तकांचे गाव भिलार मधील पाझर तलावात रविवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास एक युवक बुडाल्याची घटना घडली. यामुळे भिलार गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत या युवकाचा शोध सुरू होता.
भिलार गावातीलच चार पाच युवक पाझर तलावात चार वाजता पोहण्यासाठी गेले होते. सर्वजण पाण्यात उतरले असता. यातील एक युवक जयदीप मुकुंद भिलारे (वय 26 ) याला पोहताना दम लागला. त्यातच तो बुडू लागला. त्याने इतर मित्रांना वाचवा वाचवा असा आवाज दिला परंतु काही वेळातच तो खोल पाण्यात बुडाला.
याची माहिती गावात पसरताच गावातील युवक , वृध्द व महिला पाझर तलावाकडे धावल्या. गावातील काही युवकांनी पाण्यात उतरून जयदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तो सापडला नाही.
शेवटी काही ग्रामस्थांनी लागलीच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पांचगणीतील ऐस. ओ. ऐस. टीम च्या सदस्यांना पाचारण केले. सात वाजता या दोन्ही टीम भिलार मध्ये दाखल झाल्या. आणि रात्री उशिरा बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. परंतु रात्री उशिरा पर्यंत मुकुंद सापडू शकला नाही.
पांचगणी पोलीस, भिलारचे पोलीस पाटील, ग्रामस्थ या ठिकाण दाखल झाले. यावेळी तलावाच्या काठाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
महाबळेश्वर रेस्क्यू टीमचे सदस्य सुनील भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, अक्षय नाविलकर , अनिकेत वाघदरे, सोमनाथ वाघदरे ,सनी बावळेकर, दीपक ओंबळे, यांचेबरोबर पांचगणी ऐस ओ ऐस टीमचे सर्व सदस्य शोध मोहिमेत सहभागी झाले होते.