0.6 C
New York
Saturday, January 11, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा, काँग्रेस नव्हे; तर संघ, वैदिकवादीच खरे शत्रू

पार्थ पोळके; समता परिषद कराडमध्ये उत्साहात, पुढची परिषद झाल्यास उधळून लावा

कराड/प्रतिनिधी : – 

वैदिक, मनुवादी, पुराणवाद्यांनी सहा शास्त्रं, चार वेद आणि अठरा पुराणे लोकांच्या डोक्यात घुसवून चातुर्वर्ण्य व्यवस्था लादली. मराठ्यांना दलितांवर अन्याय करायला भाग पाडले. बाबासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता, पण वैरत्व नव्हते. काँग्रेस राजकीय दृष्ट्या प्रगत, तर सामाजिक दृष्टीने मागास असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काँग्रेसनेच बाबासाहेबांना घटना समितीत घेतले. आपल्याला शिक्षणात आरक्षण आणि नोकऱ्याही दिल्या, हे विसरू नका. असे आवाहन करत आपले खरे शत्रू मराठा किंवा काँग्रेस नव्हे; तर संघ, वैदिक, मनुवादी, पुराणवादी आहेत, असा घणाघात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कराड नगरपालिकेने मानपत्र प्रदान केल्याच्या घटनेला 2 जानेवारी 2025 रोजी 85 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी कराडमध्ये समता सामाजिक विकास संस्थेतर्फे ‘समता परिषद 2025’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर जाधव होते.

यावेळी प्रा. डॉ. राजाराम कांबळे, कराड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, माजी नगरसेवक आनंदराव लादे, शांताराम थोरवडे व नितीन ढेकळे, तसेच राहुल भोसले, संभाजी ब्रिगेडचे भूषण पाटील, मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज जाधव, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्रोही संघटक डॉ. मधुकर माने, माता रमाई महिला मंडळाच्या सौ. सारिका लादे, लोकसेवा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अक्षय सुर्वे, व्यापारी संघटक साबीरमिया मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

जातीयवाद्यांच्या ढोंगीपणावर आसूड ओढताना श्री पोळके म्हणाले, आज आपल्या समाजासमोर पारंपारिक शत्रू उभा राहिला आहे. बाबासाहेबांच्या काळातील शत्रूपेक्षा हा शत्रू बलाढ्य आहे, हे लक्षात घ्या. जातीयवाद्यांना पुन्हा आपल्यावर चातुर्वर्ण्य व्यवस्था लादायची आहे. मात्र, संघासारख्या घातकी विचार व प्रवृत्तीसोबत जावून त्याठिकाणी शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेताना दलित समाजातील आंबेडकरवादी विचारवंतांना लाज कशी वाटत नाही. काल झालेल्या बंधुता परिषदेने आपल्यात विष पेरण्याचेच काम केले आहे. परंतु, खरा आंबेडकरवादी असल्या खोट्या इतिहासाला भुलणार नाही. असे सांगत अशी परिषद पुन्हा झाल्यास ती उधळून लावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी संयोजक व समाजबांधवांना केले.

तसेच संघाची धडपड ही बहुजनांचा उद्धार करण्यासाठी नसून आपल्यावर पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था लादण्यासाठीची आहे. याला विरोध करण्यासाठी पुन्हा पॅंथरची गरज असल्याने बाबासाहेब पुन्हा हातात आणि डोक्यात घ्या, असे आवाहन करत खेड्यापाड्यातील मराठ्यांशी आपली लढाई नाही. तर आपणच निवडून दिलेले संघ व भाजपसोबत जाणारे लाचार पुढारी आणि तथाकथित आंबेडकरवादी हेही आपले शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले.

बंधुता परिषदेचा समाचार घेताना अध्यक्ष किशोर जाधव म्हणाले, एका वृत्तपत्रातील चार ओळीच्या बातमीचा संदर्भ दाखवून, वाक्यांची मोडतोड करून, मधले शब्द गाळून बाबासाहेब संघाकडे आपुलकीने पाहतात, असे चुकीचे सांगितले गेले. हा संघाकडून दलितांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न असून संघाने बंधुत्वाचा विश्वासघात केल्याचे दुःख त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच श्री पोळके यांनी या बंधुता परिषदेच्या निषेधाचे पहिले पत्र साताऱ्यातून प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.

प्रा. डॉ. राजाराम कांबळे यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर सविस्तर विवेचन केले. तसेच बाबासाहेबांनी विज्ञाननिष्ठ बौद्ध धर्माचा स्वीकार करून एक माणूस म्हणून समाजाला सन्मानाने जगण्याची मुभा मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी पाठवलेल्या संदेशाचे यावेळी जाहीर वाचन करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी बंधुता परिषदेच्या माध्यमातून विष पेरण्याचे काम झाले असल्याचे नमूद केले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचारही घेतला.

प्रास्ताविकात समता परिषदेचे संयोजक आनंदराव लादे यांनी समता सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच 2 जानेवारी 1940 रोजी बाबासाहेबांच्या कराड भेटीबाबत गैरसमज निर्माण केल्याची चुक दुरुस्त करण्याचा या समता परिषदेचा प्रयत्न आहे. यापुढेही आपण अनेक समाजवादी उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत पक्षे व सारिका लादे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रज्वल लादे यांनी सूत्रसंचालन केले. दिपाली कांबळे यांनी आभार मानले.

हिंदू धर्मच अस्तित्वात नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1995 मध्ये
हिंदू नावाचा धर्म नसल्याचे सुप्रीम कोर्टात लिहून दिले आहे. इस्लाम, ख्रिस्ती, बौद्ध, वैदिक धर्माप्रमाणे हिंदू धर्माला संस्थापक, धर्मग्रंथ, धर्मस्थळ आणि पुजारी नाही. गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, ते एका लढाईचे वर्णन आहे. 66 श्लोकांच्या गीतेचे वैदिकवाद्यांनी 250 ते 400 श्लोक केले. रामायण आणि महाभारताचेही तेच आहे. ‘सिंधू नदीकाठी वास्तव करणारे हिंदू’ अशी हिंदूंची व्याख्या केली गेली. मात्र, बाहेरून आलेल्या आर्यांना भारतीय करण्याचा हा प्रयत्न असून भविष्यात हिंदू धर्माला आधार नसल्याचे दाखवून आपल्यावर वैदिक धर्म लादण्याचा त्यांचा कुटील डाव असल्याचे श्री पोळके यांनी सांगितले.

शिवरायांनी समता निर्माण केली

मराठा समाजाने दलितांना त्रास दिल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न संघाकडून होत आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांनी महार, मांग, चांभार समाजाला किल्लेदार केले, त्यांना वतने दिली, सन्मानाची वागणूक देऊन खऱ्या अर्थाने समता निर्माण केल्याचे मत अभिषेक भोसले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

संघ शाखेस नव्हे, तत्कालीन महार वाड्यास भेट

कराड नगरपालिकेने 2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र प्रदान केले. ते स्वीकारण्यासाठी बाबासाहेब कराडला आले होते. यावेळी त्यांनी कराडमधील पूर्वाश्रमीच्या महार वस्तीला भेट दिली होती. याचे वर्णन चांगदेव भवानराव खरवडे यांनी चरित्र खंडामध्ये केले असल्याचा दाखला देत बाबासाहेबांनी कोणत्याही संघ शाखेला भेट दिली नसल्याचे प्रज्वल लादे यांनी स्पष्ट केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या