कराड/प्रतिनिधी : –
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयमध्ये सोमवार (दि. 6) जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या “दर्पण” या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या स्थापनादिनानिमित्त राज्यभरामध्ये मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन व सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यावर्षीही सोमवार (दि. 6) रोजी सकाळी 9.30 वाजता महाविद्यालयातील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सभागृहामध्ये मराठी पत्रकार दिन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील लाभले असून अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे असणार आहेत. तरी या कार्यक्रमास कराड व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींनी अगत्याने उपस्थित रहावे, असेही आवाहन प्राचार्य डॉ. सतीश घाडगे, पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. स्नेहलता शेवाळे, सदस्य प्रा. संभाजी पाटील, तसेच प्राध्यापक जीवन आंबुडारे व श्री शशिकांत पाटील यांनी केले आहे.
त्याचबरोबर पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात पत्रकारांसाठी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले असून याचाही लाभ सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.