पुणे ते सह्याद्री व्हाया कात्रज: वन्यप्राण्यांच्या स्थलांतराची विशेष मोहीम फत्ते!
शिराळा
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील वाघांच्या वास्तव्यासाठी आणि नैसर्गिक अन्नसाखळी बळकट करण्यासाठी वन विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या भक्ष्य वृद्धी कार्यक्रम अंतर्गत पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून (कात्रज) एकूण ४० वन्यप्राण्यांचे ढेबेवाडी वनपरिक्षेत्रातील झोळंबी व जानीचा आंबा परिसरात यशस्वीरीत्या स्थलांतर करण्यात आले आहे.
विशेष मोहिमेचा तपशील
दिनांक ५ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम अत्यंत गोपनीयता आणि सुरक्षेने राबवण्यात आली. यामध्ये खालील वन्यजीवांचा समावेश होता:
चितळ: ३० (१७ नर आणि १३ मादी)
सांबर: १० (०४ नर आणि ०६ मादी)
हे सर्व प्राणी पुणे ते झोळंबी अशा दीर्घ प्रवासात विशेष वाहनांद्वारे सुरक्षितपणे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असून, सध्या हे प्राणी नवीन वातावरणाशी जुळवून घेत आहेत.
वाघांच्या संवर्धनासाठी ‘प्रे-बेस’ महत्त्वाचा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या भागात वाघांचे मुख्य खाद्य असलेल्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या मर्यादित असल्याने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या नवीन पाहुण्यांमुळे येथील अन्नसाखळी अधिक बळकट होणार आहे.
अधिकारी व संस्थांचे योगदान
या मोहिमेसाठी पुण्यातील रेस्कु चॅरिटेबल ट्रस्ट बावधन यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे संचालक तुषार चव्हाण, उपसंचालक स्नेहलता पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली.





