कोयना दूध संघात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घोषणा; शेतकरीहित आणि विकास केंद्रस्थानी ठेवून पुढील वाटचालीचा निर्धार
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारातील राजकीय समीकरणांना बुधवारी नवे वळण मिळाले. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटनेने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला उघड पाठिंबा जाहीर करत सहकारातील ऐक्याचा संदेश दिला. कोयना दूध संघाच्या कार्यस्थळावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही भूमिका एकमुखाने घोषित करण्यात आली.
यावेळी बोलताना सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी ‘कृष्णा’ आणि ‘रयत’ परिवारातील जुने सलोख्याचे संबंध अधोरेखित केले. स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि स्व. विलासराव पाटील (काका) यांनी समाजकारण व राजकारणात दीर्घकाळ खांद्याला खांदा लावून काम करत सहकाराची मजबूत परंपरा निर्माण केली होती. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत शेतकरीहित आणि विकास हेच केंद्रस्थानी ठेवून पुढील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृष्णा कारखान्याने गेल्या अकरा वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना डॉ. भोसले यांनी, सभासदांचा विश्वास आणि शेतकऱ्यांची साथ हेच संस्थेचे खरे बळ असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
रयत संघटनेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना, आजचा प्रश्न हा आपल्या जीवनाशी आणि रोजीरोटीशी निगडित आहे. त्यामुळे संघटना आणि संस्था एकमेकांना पूरक ठरतील, अशा पद्धतीने काम करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. सहकार पॅनेलला रयत संघटनेचे कार्यकर्ते व सभासद पूर्ण ताकदीने सहकार्य करतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मेळाव्यास रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यास कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत सहकार पॅनेलची ताकद अधिक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





