खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी
परभणी –
परभणी शहरात आयोजित शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहताच मराठा आरक्षण आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेत “घोषणा देणारे लोक आपलेच आहेत, त्यांना मंचावर बोलवा,” अशा सूचना पोलिसांना व आयोजकांना दिल्या.
या मेळाव्याला परभणी जिल्ह्यासह लगतच्या भागातील शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार संजय जाधव यांचे भाषण सुरू असतानाही कार्यक्रमस्थळी काही तरुणांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती चिघळण्याआधीच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना सभास्थळावरून बाजूला केले.
“घोषणा देणारे आपलेच”-एकनाथ शिंदे
आपल्या भाषणाला सुरुवात करताना झालेल्या घोषणाबाजीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतता राखत म्हटले, “घोषणा देणारे हे आपलेच लोक आहेत. पोलिसांनी आपल्याच लोकांना बाजूला थांबवून ठेवावे किंवा त्यांना मंचावर येऊ द्यावे.” यानंतर त्यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.
उपमुख्यमंत्री म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ज्याप्रमाणे विराट सभा व्हायच्या, तशीच ही सभा होत आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेत आहोत. परवा रक्षाबंधन झाले, हजारो लाडक्या बहिणी आल्या. आजही अनेक बहिणींनी राख्या बांधल्या. मी विरोधी पक्षनेता होतो, मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहे. पण महाराष्ट्रात ‘लाडक्या बहिणींचा भाऊ’ ही मला मिळालेली सगळ्यात मोठी पदवी आणि ओळख आहे.”





