जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कराड/प्रतिनिधी:-
राज्यातील 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असताना कराड तालुक्याचा त्यामध्ये समावेश झालेला नाही. मात्र तालुक्यातील अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करीत संपूर्ण कराड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कराड तालुक्यातील खरीप क्षेत्रापैकी तब्बल 19 हजार हेक्टर क्षेत्र जिरायती आहे. एकूण 32 हजार 500 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 13 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून, उर्वरित 58 टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. उंडाळे, येवती, काले, मसूर, इंदोली आणि उंब्रज या महसूल मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करताना वगळण्यात आलेल्या 93 तालुक्यांचा मंडळनिहाय आढावा घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या तालुक्यांमधील बहुसंख्य महसूल मंडळे ‘ट्रिगर-1’ निकषात येत असल्यास संबंधित संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. नव्या साखळी बंधार्यांची कामे हाती घेण्याबरोबरच अस्तित्वातील बंधार्यांमधील गाळ काढण्याची कामे तातडीने सुरू करावीत. ही कामे रोजगार हमी योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबवावीत, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळाचा परिणाम झालेल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने परिस्थितीचा फेरआढावा घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.





