जालन्यातील गावात झळकला बॅनर
जालना :
मराठा आरक्षणाच्या उपोषणाचं केंद्र बनलेल्या जालना (Jalana) जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे आणि मनोज जरांगेंमुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं होतं. मात्र, जरांगे यांनी त्याच गावात मंडप टाकून उपोषण केलं. त्यानंतर, जरांगेंच्या मागणीला विरोध करत ओबीसी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जालना जिल्ह्यातूनच उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणालाही राज्यभरातून ओबीसी समाजाने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे, सरसकट सगेसोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे, या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर, सरकारसोबत हाकेंच्या शिष्टमंडळाची व ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर हाके यांनीही आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या उपोषणाचा परिणाम राज्यातील सामाजिक सलोख्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्हीही नेते मराठा आणि ओबीसी हे भाऊ-भाऊ असल्याचं सांगतात. मात्र, गावपातळीवर याची धग पोहोचल्याचं दिसून येत आहे.
लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात या आशयाचा फलक लावला आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता सामाजिक वातावरण बिघडत चालल्याचं दिसून येत आहे. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशाराही या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या फलकाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन समाजात तेढ निर्माण करणारा हा बॅनर असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासनाकडून हा बॅनर हटवला जाऊन कारवाई केली जाईल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.