Krushnakath / 22jan2025 / Ashkok Sutar
महायुतीमध्ये कोणाचा उदय ?
राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीमधील पक्षांबाबत नुकतेच एक विधान केले आहे. हे विधान सनसनाटी आहे, ते म्हणजे, महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य संपत नसल्याचे दिसत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजी सरकारवर नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदेंची गरज भाजपसाठी संपली आहे का ? उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना आणले, तशाप्रकारे शिंदे गटात नवीन उदय पुढे येईल. वडेट्टिवार यांच्या विधानाने महायुतीमध्ये खळबळ माजली आहे. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले वाद, दोन पालकमंत्री पदे स्थगित करण्याची नामुष्की आणि उप मुख्यन्तृ एकनाथ शिंदे यांची नाराजी हे सर्व जुळून आले आहे. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे असे वाटते.
————————————————————–
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. कारण महायुतीच्या पक्षांना बहुमत मिळाले. यात अर्थात भाजपचा वाटा महत्वाचा होता. सरकार स्थापन झाल्यानंतर बर्याच गोष्टींवरून नाराजीनाट्य सुरू झाले. सुरूवातीला मुख्यमंत्रिपदाची निवड, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि आता पालकमंत्रिपदांवरून वाद इथपर्यंत महायुतीमधील नाराजीनाट्याचे प्रयोग रंगू लागले आहेत. पालकमंत्रि पदावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरे येथे गावी जाऊन बसले आहेत, याचीही चर्चा रंगली आहे. जी पालकमंत्री पदे स्थगित केली आहेत, त्यांचा संबंध थेट शिवसेना शिंदे गटाशी असल्याने शिंदे विद्यमान सरकारवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. कोंग्रेस नेते विजय वडेट्टीवार किंवा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटात नवीन उदय होणार का ? महायुतीमधील नाराजी नाट्याचा शेवटचा अंक कुठल्या घटनेने समाप्त होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने मूळ शिवसेनेतील नाराजीचा राजकीय लाभ उठवत एकनाथ शिंदे यांना फितवले आणि आपल्या बाजूला घेतले, तशाच प्रकारे आज एकनाथ शिंदे डोईजड ठरत आहेत, असे दिसल्यावर या नाराजीनाट्यामुळे शिंदे गटात फुट पाडून नवा राजकीय उदय करता येईल का,असे प्रयत्न सुरू असल्याची शंका बळावत आहे.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आणि रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा बर्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु, एवढा कालावधी मिळूनही सरकारने पालकमंत्री जाहीर केल्यानंतरही दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्या स्थगीत करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. यापूर्वीच महायुतीमधील तीन पक्षांनी त्यावर जिल्हावार चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. या पक्षाला दुखावायचे नाही म्हणून ऐनवेळी पालकमंत्री पद जाहीर करून नाराजी ओढून घेण्यात काय मतलब ? रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांचे नाव जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजी सरकरमधील सामील पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचेच समोर आले. यातून निर्माण होणारी नाराजी कुठल्या टोकाला जाऊ शकते. याचा विचार सत्ताधारी पक्ष व मुख्यमंत्री करत नाहीत असेच दिसते. तसेच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही, पालकमंत्र्यांच्या यादीत गोगावले यांचे नाव नसणे हे आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक होते, अशी प्रतिक्रिया दिली होती.
महायुतीमधील नेत्यांच्या जाहीर वक्तव्यांमुळे महायुतीत पालकमंत्रिपदांवरून ताळमेळ नाही असेच दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावधपणे म्हटले आहे की, मुख्यमंत्री दावोसला गेले असताना पालकमंत्री पदाचा प्रश्न उद्भवला हे योग्य नाही. पण राजकारणात काही वेळेला अशा गोष्टी घडत असतात.यामुळे आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. एकनाथ शिंदे त्यांच्या दारे येथील गावात येवून थांबले आहेत. त्यांना काही विचारले की ते म्हणतात, मी गावी आलो की, लोक म्हणतात मी नाराज झालो. मी सध्या नवीन महाबळेश्वर या पर्यटन प्रकल्पाचा विचार करत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा गावी यावे लागेल.
महाविकास आघाडीतले नेते महायुती सरकारमधील नाराजीवर बोट ठेवताना दिसत आहेत. काँग्रेसने ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याचे म्हटले आहे. तसेच, महायुतीचे सरकार असताना सरकारमध्ये धुसफूस सुरूच आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्ट्वार यांनी आता नवीनच शंका उपस्थित केली आहे, ती म्हणजे, शिवसेनेत नवीन उदय होतोय, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. वडेट्टीवारांचा इशारा उदय सामंत यांच्या नावाकडे आहे, हे स्पष्ट आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही उदय सामंत यांच्यासोबत काही आमदार असल्याचा दावा केला. परंतु उदय सामंत यांनी विरोधकांनी व्यक्त केलेली शंका फेटाळली आहे. सामंत यांनी म्हटले आहे की, माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्रीपद, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावर तीन पक्ष एकत्र असताना वारंवार असे प्रश्न उपस्थित होणे हे महायुतीमधील अस्थैर्य, विचलितपणाचे लक्षण आहे असे वाटते.
ता. क. – राजकारणात केव्हाही, काहीही घडू शकते. महायुतीतील या नाराजीनाट्यातून कोणाचा, केव्हा उदय होईल हे सांगता येत नाही.