1.5 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

सर्वसमावेशक हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

कृष्णाकाठ/ दि.२३ जानेवारी २०२३ / अशोक सुतार

सर्वसमावेशक हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

 

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. परंतु त्यांचे हिंदुत्व सर्वसामावेशक होते, ते संकुचित विचारांचे नव्हते. बाळासाहेबांनी शिवसेनेत तळागाळातील लोकांना संधी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने महाराष्ट्रात एक राजकीय पोकळी निर्माण झाली, त्याचा राजकीय फायदा घेत अनेक राजकीय पक्ष हिंदुत्वाचा नारा देत राज्यात राजकारण करीत आहेत. पण बाळासाहेबांच्या नेतृत्व कौशल्याची सर कोणत्याच नेत्याला येणार नाही हे नक्की. महाराष्ट्राला बाळासाहेबांची उणीव नेहमीच भासत राहील.

———————————————————————-

महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे हे मूळ शिवसेनेचे संस्थापक होत. शिवसेना स्थापन करताना मुंबईत १९६६ साली बाळासाहेबांसमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दलाचे आव्हान होते. हे दिग्गज राजकीय पक्ष आहेत आणि त्यांचा विरोध करून मुंबईतील सत्ता हस्तगत कशी करायची हा प्रश्न समोर होता. परंतु शिवसेनेने उठ मराठ्या जागा हो, मुंबई मराठी माणसाची अशी भावनिक सद घातली आणि शिवसेनेच्या पाठीमागे लाखो लोक उभे राहिले. त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या दैनिक मराठा व इंग्रजी वर्तमानपत्र फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते. व्यंगचित्रांतून बाळासाहेबांनी अनेक सामाजिक प्रश्न जोरकसपणे मांडले. त्यावेळी आधुनिक प्रसारमाध्यमे नसल्यामुळे मुद्रित वर्तमानपत्रे सकाळी आपल्या दारी येण्याची लोकांना वाट पहावी लागत असे. लोक वर्तमानपत्रांत पहिले बाळासाहेबांचे व्यंगचित्र पाहात असत. त्या व्यंगचित्रामुळे लोकांना राजकीय आणि सामाजिक परिस्थिति काय चालली आहे याचा उलगडा होई. बाळासाहेबांचा पत्रकारितेतील व व्यंगचित्रकारितेतील अभ्यास सामाजिक जाणीव करून देत होता. मराठी माणसाच्या न्याय व हक्कासाठी एक राजकीय संघटना स्थापन करावी असे बाळासाहेबांच्या मनात आले. त्यातून शिवसेनेचा जन्म झाला. आज बाळासाहेब ठाकरे यांचा ९९ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

बाळासाहेबांचे नाव बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे आहे. ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, मराठी लोकांचे समर्थक होते. दैनिक सामनाचे संस्थापक संपादकही होते. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘ प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. या दैनिकात वाद झाल्यानंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्र साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये मार्मिक हे मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिक हे नाव बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते.प्रबोधकार केशव ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पत्रकार होते. मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना  बाळासाहेबांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली.

इ.स. १९६० पासून ते राष्ट्रीय व राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी लोकांना मार्गदर्शन करत मार्मिकने महत्त्वाची भूमिका बजावली. ठाकरेंनी दि. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागे राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. बाळासाहेबांनी मुंबईतील मराठी माणसाला न्याय व हक्क देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनेचा पहिला मेळावा दि.३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.

बाळासाहेब ठाकरे हे स्पष्टवक्ते होते. त्यांच्या भाषणात जोरकसपणा,विनोद, नकला आणि अन्यायाविरोधात लोकांना चेतवण्याची दृष्टी होती. बाळासाहेबांकडे फक्त वक्तृत्वच नव्हते तर भेदक लेखन हे त्यांचे अस्त्र होते.      त्यांच्या लेखनशैलीवर प्रबोधनकार ठाकरेंचा प्रभाव होता. व्यंगचित्रकाराची चाणाक्ष निरीक्षणदृष्टीही होती. बाळासाहेबांच्या टोकदार लिखाणामुळे लवकरच सामना हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेने मुंबईतील तत्कालीन बड्या राजकीय पक्षांना धूळ चारीत मुंबई महापालिका आणि राज्यात विधानसभेवर सत्ता आणली. सत्तेवर येताच तत्कालीन सरकारने झुणका भाकर योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना राबवली. बाळासाहेबांनी परप्रांतीयांविरोधात राबविलेली मोहीम पुन्हा त्यांच्या मृत्युनंतर बारगळली. आता मूळ शिवसेनेत फुट पडली असून त्यातून दोन गट निर्माण झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे विचार त्यांनी मांडले. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट ही पदवी दिली होती. यांनी दिलेली, गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती. दि. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या