वानराने विद्युत तारेवर उडी मारल्याने शॉर्टसर्किट; गोटे गावचे हद्दीतील घटना, पाऊण तासानंतर आग आटोक्यात
कराड/प्रतिनिधी : –
पुणे-बंगळूरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत मोकळ्या जागेवर ठेवलेल्या गॅस पाईपच्या ढीगाला अचानक भीषण आग लागली. नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत तारांवर वानराने उडी मारल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. यामुळे हवेत धुरांचे मोठमोठे लोट उसळले होते. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, जळालेल्या पाईपच्या ढीगाशेजारी मोठे दोन जनरेटर या आगीतून वाचले आहेत. कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबानी वेळीच आग आटोक्यात आणल्याने हे नुकसान त्याल्ण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून पाईपद्वारे गॅस वितरण करण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामाच्या पाईप्स ठेवण्यासाठी गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेली मोकळी जागा संबंधित ठेकेदाराने भाडेतत्त्वावर घेतली होती. या मोकळ्या जागेत गेल्या अनेक दिवसांपासून गॅसच्या पाईपांचा मोठा ढीग ठेवण्यात आला होता. या ढीगाच्या शेजारी दोन विद्युत ट्रान्सफॉर्मर आहेत.
गुरुवार (दि. 23) रोजी दुपारी 1 वाजण्याचा सुमारास ट्रांसफार्मरच्या तारांवर एका वानराने उडी घेतली. यामुळे विद्युततारा एकमेकांना चिकटल्याने शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात ठिणग्या पडल्या. यामुळे सुरुवातीला पाईपच्या ढीगाशेजारी असलेल्या लहान प्लास्टिक पाईपच्या बंडलने पेट घेतला. त्यानंतर वाऱ्याने ही आग लगतच्या प्लास्टिक गॅस पाईपच्या ढीगाला लागली. तसेच याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कव्हर असलेल्या लोखंडी पाईपही ठेवण्यात आल्या होत्या. या पाईपांनीही आग पकडल्याने आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे थोड्या वेळातच हवेत धुरांचे मोठे लोट उसळले.
दरम्यान, आग लागल्याचे निदर्शनास येतात तेथील कामगार व स्थानिकांनी तात्काळ कराड नगरपालिका व कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन बंबास पाचारण केले. सुरुवातीला कराड पालिकेच्या अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलचा अग्निशामक बंब दाखल झाला. तसेच कराड पालिकेने पाण्याचा टँकरही मागवला होता. सुमारे पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनच्या जवानांना यश आले. तोपर्यंत प्लास्टिकच्या पाईप मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्या होत्या. तसेच लोखंडी पाइपवरील प्लास्टिक कोटिंग जळून गेल्याने या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या भीषण आगीमुळे हवेत मोठमोठे धुरांचे लोट उसळले होते. खूप लांबून ही आग व धुरांचे लोट दिसत असल्याने याठिकाणी आग पाहण्यासाठी प्रवाशांसह लोकांनी मोठी गर्दी केली होती. महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडीही झाली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही.