अग्रलेख/दि. २४ जानेवारी २०२५
अफवा, वल्गनांचे राजकारण
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी एक मोठी यादी आहे, तसेच भाजपाकडेही पक्षप्रवेशासाठी मोठी यादी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडेही पक्षप्रवेशासाठी एक यादी आहे. त्यामुळे आम्ही तिघेही एकत्र बसून कोणत्या पक्षप्रवेशामुळे महायुती अजून भक्कम होईल? म्हणजे कोणत्या नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे महायुती आणखी मजबूत होईल आणि कोणत्या पक्षामुळे महायुतीला धोका निर्माण होईल याचा विचार आम्ही करणार आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. असो. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशाच वावड्या सुरू असल्याचे दिसत आहे. अफवा पसरवायला बुद्धीमंत असण्याची गरज नसते. मुख्यमंत्री आणि उदय सामंत आता दावोसमधील दौरा आटोपून आले असतील. ते जेव्हा दावोस दौर्यावर असताना शिवसेना शिंदे गटात नवा उदय होणार असल्याची अफवा (की खात्री ?) पसरवली गेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पक्षातील शिलेदारांसाठी पालकमंत्री पदाची मागणी थंड पडेल असे विरोधकांना वाटले असावे. भाजपाच्या लोकांचीही करमणूक झाली. परंतु आता राजकारणाचा नवा अध्याय सुरू होत आहे. महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते संभाव्य आयारामांची यादी घेऊन बसले आहेत आणि लवकरच महा विकास आघाडीतील काही मंडळी आपल्याकडेच येणार अशा वल्गना सत्ताधार्यांकडून सुरू झाल्या आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे, अश्या बातम्या छापून येतात. त्या खर्या असतीलच असे नाही. असे असतानाच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावा केला आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, १० माजी आमदार आणि काँग्रेसचे ५ आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील. उदय सामंत यांनी हा दावा नुकताच केला आहे. याचा पहिला टप्पा आज पार पडणार असल्याचेही ही उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. सामंत यांनी असेही म्हटले आहे की, काही नेते आपला राजकारणात उदय करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करीत आहेत. त्यामुळे हा माझा मोठेपणा आहे. पण अशा कोणत्याही बालिश विधानामुळे माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात दरी निर्माण होणार नाही. उदय सामंत यांच्या विधानांवरून असे वाटते की, शिवसेना एकनाथ शिंदे गटात फुट पडणार नाही. ही तर विरोधकांनी पसरवलेली अफवा होती. आता विरोधकांच्या अफवेला उत्तर देण्यासाठी महायुतीमधील पक्ष तयारी करत आहेत असेच वाटते. खरेतर असे डावपेच राजकारणात नेहमीच सुरू असतात.
सामंत शिवसेना ठाकरे पक्षावर चिडलेले दिसतात. त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मी कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. त्यानंतर सातारा आणि सातार्यानंतर पुणे असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणार्यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी आमच्या पक्षात येणार्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे. आता तुम्हाला उद्यापासून ठाकरे गटातून दररोज एकजण फुटल्याची बातमी पाहायला मिळेल, असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा किंवा अफवा राजकीय वर्तुळात आहे. सामंत यांनी शिवसेनेच्या संजय राऊतांवर तोंडसुख घेतले आहे.
अशाप्रकारे महा विकास आघाडी आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा आरोप – प्रत्यारोपंचे सत्र सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्राचा विकास सध्या दुर्लक्षित झालेला दिसत आहे. याकडे राजी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे हे खरे ! राज्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान सताधार्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले असते तर अशा फुटकळ गोष्टींवर सत्ताधारी विचलित झाले नसते. विरोधकांचा नेहमीच प्रयत्न असतो की, सत्ताधार्यांना विचलित करून त्यांच्यात वैचारिक आणि नंतर राजकीय फुट पाडणे. परंतु त्यांचे षडयंत्र सत्ताधारी पक्षांना समजणे गरजेचे असते. सध्या पालकमंत्री पदावरून सुरू झालेली महायुतीमधील सुंदोपसुंदी प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांचे फावते आणि विविध अफवा, वावड्या यांचे पीक निघते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडेवारीसहित विरोधकांमधील पक्षनिहाय आयारामांची यादी जाहीर केली. ही यादी खरी असेल किंवा खोटी ! त्याबद्दल संभ्रम असावा असे वाटते. शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य विरोधक शिवसेना ठाकरे पक्षातील नेते आहेत तसेच राज्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नेते आहेत. त्यांच्या अफवा, चर्चांना तोंड देताना ते संयमाने दिले पाहिजे असे वाटते. परंतु विद्यान महायुतीमधील सहभागी तीनही पक्षांत संयम नाही आणि ते विरोधी बाकावर असताना ज्याप्रकारचे वर्तन करत होते, तसेच आता ते पूर्वीप्रमाणेच वर्तन करीत असल्याचे दिसते. विरोधकांतिल आयारामांचा महायुतीत प्रवेश अशी बातमी पेरून ते खरोखरच महायुतीमध्ये येणार असतील आणि शिवसेना ठाकरे गटात धमाका उडणार असेल तर‘होऊ द्या तुमच्या मनासारखे’असे जनता म्हणेल. जनतेला विकास महत्वाचा आहे, तुमच्या भानगडी महत्वाच्या नाहीत हे मात्र खरे आहे.