कृष्णाकाठ / 30 jan2025/ अशोक सुतार
वन्यप्राणी मानवी वस्तीत…
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. कराड परिसरातील तांबवे येथे बिबट्याचा बघडा सापडला. उंडाळे परिसरात बिबट्या रस्त्याच्या बाजूला दिसला अशा अनेक बातम्या आता वाचनात येत आहेत. असे का होत आहे ? वन्यप्राणी मानवी हद्दीत का येत आहेत ? असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. खरे तर मानवाने मानवी वस्तीच्या आजूबाजूची जंगले सफाचट करून तिथे बंगले, इमारती उभ्या केल्या. मानव जंगली वस्तीत शिरू लागला तर वन्यप्राणी दिसल्यास नवल नाही. तसेच जंगलांमध्ये पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे वन्यप्राणी भटकत पाण्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. महिनाभरात सातारा जिल्ह्यात आढळलेला चौथा मृत बिबट्या असल्याने खळबळ उडाली आहे.
निंभोरे गावालगत एका शेतात ग्रामस्थांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी ही बाब फलटण
वनविभागाला कळवली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे
याचा तपास करीत आहेत. फलटण तालुक्यात निंबलक, मुंजवडी, गिरवी या परिसरात अनेकदा बिबट्या
दिसला होता. वनविभागाच्या कॅमेऱ्यात देखील बिबट्या कैद झाला होता. मात्र, पुणे-पंढरपूरसारख्या
रहदारीच्या परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.
बिबट्याचे वास्तव्य या भागात असेल तर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वन विभागाकडून
सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात कराडजवळ ३ बिबटे मृत आढळले होते. यानंतर लगोलग फलटण
परिसरात चौथा मृत बिबट्या आढळला.वाघांची शिकार होणे ही एक चिंताजनक बाब झाली आहे.
वाघ मानवी वस्तीत येणे नित्याचे झाले आहे. काही वेळा मानवाने जंगलात अतिक्रमण केलेले आढळते,
त्यामुळेही वाघ आणि मानव यांत संघर्ष पहायला मिळतो. परंतु यासाठी वाघांचे स्थलांतर हा मुद्दा चर्चेत
येत आहे. वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराची प्रक्रिया सतत व निरंतर चालणारी आहे. मात्र कालानुरूप
मानवामुळे यामध्ये व्यत्यय निर्माण झाला. वाघांच्या नैसर्गिक स्थालांतरासाठीचे संचार मार्ग आता आकुंचन
पावलेले आहेत. तर काही ठिकाणी ते नष्ट होण्याच्या मार्गावरही आहेत. त्यामुळे वाघांच्या स्थलांतराच्या
नैसर्गिक प्रक्रियेचा प्रवास आता कृत्रिम स्थलांतरणाकडे वळला आहे. एका अधिवासातून दुसर्या अधिवासात
वाघांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरूच असते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २०२३ मध्ये गोंदिया
जिल्ह्यात दोन वाघांना कृत्रिमरित्या सोडण्यात आले होते. या प्रयोगाकडे सकारात्मकरित्या पाहिले तरीही
वाघ आणि मानवाच्या संघर्षाची धार यातून किती कमी करता येईल हा येणारा काळच सांगेल.
नवीन अधिवास शोधणे, वंशवृद्धी व वंशसमृद्धीसाठी नवीन जोडीदार शोधणे, खाद्यासाठी भटकंती करणे
आणि एकाच परिसरात एकाहून अधिक वाघ झाल्यास एकाला तो परिसर सोडून नव्या ठिकाणी जावे लागते. थोडक्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वाघ स्थलांतर करतात. वाघांच्या स्थलांतराचे
नैसर्गिक मार्ग ठरलेले आहेत. अलीकडच्या काळात रेडिओ कॉलरसारख्या आधुनिक पद्धतीमुळे यातील
अनेक बारकावे व नवनवीन शोध पुढे आले आहेत. जगातील सर्वाधिक मोठ्या अंतराचे वाघांचे स्थलांतर
महाराष्ट्रात झाले असल्याचे आढळले आहे. विकासाच्या गाडीच्या सुसाट वेगामुळे वन्यप्राण्यांच्या, पर्यायाने
वाघांच्या अधिवासाला कात्री लागून जंगले कमी होत आहे. भारतात दर दिवसाला ३५ हेक्टर जंगल नष्ट
होत आहे ही वन्य प्राण्यांच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे जंगलालगत येणार्या प्रकल्पांची
संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्यामुळे, खेडी फुगत चालल्यामुळे
वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा येत आहे. गेल्या शतकात वाघांच्या अधिवासात तब्बल ५७ टक्के
लोकसंख्या वाढ झाली. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.
वन्यप्राणी मानवी वस्तीत आढळल्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार आणि बेकायदा तस्करी या समस्या वाढत
आहेत. मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. एकाच
विशिष्ट क्षेत्रात वाघ अडकून राहिल्यास जनुकीय समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाघांचे
नैसर्गिक स्थलांतर आवश्यक आहे. जेरबंद केलेल्या वाघांच्या बाबतीमध्ये रेस्क्यू सेंटर व प्राणी संग्रहालय
यांची क्षमता पूर्ण झाली आहे, स्थानिक नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक स्थलांतर झाले तर बऱ्याच गोष्टी
सुलभ होतात. सर्वांत मोठा फरक हा वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा असतो. स्थानिक वनस्पती,
तापमान, पाणी इतर जैविक विविधता यात फरक असतो. स्थलांतरण करताना प्राण्यांच्या मूळ प्रवृत्तीचा
अभ्यास करावा लागतो. तो न करता केलेले स्थलांतरण अयशस्वी ठरू शकते. महाराष्ट्र हे नैसर्गिक
स्थलांतराच्या बाबतीत भारतात अग्रेसर आहे. वाघांचे मानवी वस्तीत होणारे मृत्यू चिंतेचे आहेत. तसेच
मानवी वस्तीत वाघांचे मानवावर होणारे हल्ले वाढले आहेत. परंतु उपाय राबवताना अनेक अडचणी येत
असल्याचे दिसुन आले. तसेच मानवी वस्तीत म्हणजे शेतामध्ये वाघांचे बछडे आढळून आले आहेत. त्यामुळे
वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष निर्माण होतो, असे दिसुन येते.
नवीन ठिकाणी येणारे वाघ, त्यांच्यात स्थलांतरामुळे होणारे बदल याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. भारतात नवीन जंगले तयार होणे गरजेचे वाटते. कारण वन्यप्राणी अन्य ठिकाणी स्थलांतर करीत असल्याचे दिसुन आले आहे. जेव्हा वन्यप्राण्यांना
जंगलात खाद्य, पाणी मिळत नाही.त्यावेळी वाघ वा अन्य प्राणी मानवी वस्तीकडे येतात, असा अनुभव आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना अनुकूल वातावरणही महत्वाचे आहे, वाघांचे स्थलांतर महत्वाचे आहे. त्याचे योग्य ते नियोजन केले जाणे आवश्यक आहे. अन्यथा हे स्थलांतर धोकादायक ठरू शकेल, असे वाटते.