शिवराज मोरे; युवक काँग्रेस कार्याध्यक्ष निवडून नंतर कराडमध्ये जल्लोषी स्वागत, प्रीतिसंगमावर अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व महायुतीला अपयश आले. परंतु, एका निवडणुकीतील पराभवामुळे खचून न जाता येत्या काळात जास्तीत जास्त युवकांचे संघटन करून काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला.
या निवडीनंतर कराड शहर व तालुका काँग्रेस, तसेच युवक काँग्रेस आणि शिवराज मोरे मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे कराडमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवतीर्थ दत्त चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला, तसेच प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेस आणि शिवराज मोरे मित्र परिवाराचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री मोरे म्हणाले, लोकसभा आणि त्यानंतर राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर केंद्रात आणि राज्यात अनेक पक्षीय फेरबदल होत आहेत. याची सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यानंतर विचारपूर्वक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. पक्षाने आतापर्यंत वेळोवेळी दिलेली जबाबदारी आपण सक्षमपणे व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. यापुढेही हीच भूमिका राहणार आहे. कराड व संपूर्ण सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेवर वाटचाल करतो. त्याच विचारानुसार कराड शहर, तालुका व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. अपयशाने खचून न जाता येत्या काळात जास्तीत जास्त युवकांचे संघटन करून पुन्हा नव्या जोमाने उभा राहू, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.