0.2 C
New York
Friday, February 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

पंचायत समिती, आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर

जीबीएस सदृश्य दोन रुग्ण; गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटी, सूचनांसह कारवाईचे लेखी पत्राद्वारे आदेश

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यात जीबीएसचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदरचे वृत्त प्रसिद्ध होताच पंचायत समिती आणि आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर आला असून गटविकास अधिकाऱ्यांनी बाधित ठिकाणी भेट देत विविध सूचनांसह संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, कराड तालुक्यात जीबीएसचा (गुईलेन बैरे सिंड्रोम) एक रुग्ण आढळला होता. याबाबतची माहिती घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच गटविकास अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यानंतर याबाबतचे वृत्त दैनिक प्रीतिसंगमने प्रसिद्ध केल्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभाग चांगलाच ऍक्टिव्ह मोडवर आला आहे.

कराड तालुक्यातील कोडोली या एकाच गावात दोन मुलींमध्ये जीबीएस सदृश्य रोगाची लक्षणे आढळली असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा असल्याने त्यांना एक-दोन दिवसात रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रताप पाटील यांनी दिली.

कराड : हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या तब्बेतीची विचारपूस करताना गटविकास अधिकारी प्रताप पाटील.

तसेच आज शनिवार (दि. 1) फेब्रुवारी रोजी सदर बाधित ठिकाणी आपण स्वतः भेट दिली आहे. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षकांना गृहभेटी देण्याच्या सूचना केल्या असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी गावचे सरपंच, एमओ, सीएचओ उपस्थित होते. गावातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून सर्व पातळ्यांवर 100 टक्के खबरदारी घेण्यात येत असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, गावातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेमध्ये मुलांसाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था करावी, त्याठिकाणी हँडवॉश ठेवण्यात यावा, शाळा व गाव परिसरात स्वच्छता ठेवावी आदी सूचनाही यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अनधिकृत खाद्यपदार्थ गाडेधारकांवर कारवाईचे आदेश

कराड शहरालगत व कोडोली नजीकच्या कार्वे गावात पाणीपुरी, समोसा, भेळ, वडापाव आदी खाद्यपदार्थांचे गाडे आहेत. या सर्व गाडेधारकांच्या शासकीय परवान्यांबाबत खातरजमा करून परवाने नसलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थ गाडेधारकांवर लेखी पत्राद्वारे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी सांगितले.

कराड व मलकापूर नगरपालिकेला पत्र

कराड व मलकापूर नगरपालिका प्रशासनाकडून आरोग्यासंदर्भात शहरात विविध खबरदाऱ्या घेण्यात येतात. मात्र, कराड व मलकापूर शहरांलगतच्या गावांमध्ये काही दूषित पाण्याचे नमुने आढळलेत. अशा संबंधित ग्रामपंचायतींना खबरदारीच्या सूचना देण्यात याव्या, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, लोकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात यावे, आदी सूचना दोन्ही नगरपालिकांच्या प्रशासक तथा मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकारी श्री पाटील यांनी सांगितले.

बाधित ठिकाणी भेट देऊन गृहभेटी देत जागृती करण्यासह स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे. जीबीएस सदृश्य दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा आहे. तसेच बाधित गावांसह परिसरात व एकूणच तालुक्यात प्रशासनाकडून 100 टक्के खबरदारी घेण्यात येत आहे.

– प्रताप पाटील (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कराड)

जीबीएसबाबत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत. संबंधित गाडेधारकांनाही सक्त सूचना दिल्या आहेत. बाधित ठिकाणचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून एक-दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.

– नरेंद्र माळी (तालुका वैद्यकीय अधिकारी, कराड)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या