कृष्णकाठ / अशोक सुतार
खासगी सावकारी बंद करा
सध्या सावकारीचा धंदा बोकाळला आहे. मोलमजुरी करणारे गरीब, सर्वसामान्य माणूस सावकारीच्या पाशात अडकतात. सावकारी हा पाश आहे आणि त्यात जो अडकला, तो त्यातून बाहेर येत नाही. सर्वत्र सावकारी धंद्याचे स्तोम माजले असून अनेक धनदांडगे अवैधपणे सावकारीचा धंदा करतात. हा धंदा करताना प्रसंगी गुंडही बाळगतात. गुंडांच्या मदतीने ते समाजात सावज हेरत असतात. वाईट धंद्यातून मिळालेला पैसा जास्त व्याज दराने लोकांना देऊन भरपूर माया जमा करतात. महात्मा फुल्यांनी तत्कालीन खासगी सावकारांचे कर्ज कधीही घेऊ नये,असा सल्ला दिला होता. संत तुकारामही खासगी सावकारांचे कर्ज घेऊ नका असे उपदेश करत. काही खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर त्याचे चक्रवाढव्याज लावून लोकांची पिळवणूक करतात. कितीही परतफेड केली तरी कर्जाचे हफ्ते थांबत नाहीत. अखेर कर्ज घेणारा जीवनाला कंटाळतो आणि मृत्युला कवटाळतो.
सर्वसामान्य लोकांनी जीवन जगताना आपली कमाई पाहूनच खर्च करावा. अतिरिक्त खर्च टाळावा, ऋण काढून सण साजरे करू नयेत, असे महात्मा जोतिबा फुलेंनी म्हटले आहे. खासगी सावकारी करणे ही मानसिकता असते. जास्तीत जास्त पैसा कसा येईल, असा स्वार्थी विचार या मानसिकतेमागे दडलेला असतो. लोकांना कर्ज दिल्यावर गुंड पाठवून खासगी सावकार लोकांकडून कर्जाची रक्कम वसूली करताना लोकांचा अपमान करणे, प्रसंगी जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकार घडतात. प्रसंगी जीवही घेतला जातो किंवा जीव देण्यासाठी सावकारांचा दबावही कारणीभूत असतो. त्यामुळे खासगी सावकारांबद्दल समाजात भीती निर्माण झाली आहे. परंतु गरिबीला वैतागलेले लोक सावकारांच्या आहारी जातात. नंतर अवाजवी दराने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात. परंतु एखादा कर्जाचा हफ्ता रखडला की, लोकांना सावकारांच्या जाचाला सामोरे जावे लागते. सावकारी पाशाला घाबरलेले लोक जीवाचे बारेवाईट करतात. सावकारी पाशाने आत्तापर्यंत राज्यात अनेक बळी गेले असावेत, अशी शंका आहे. त्यामुळे राज्यातील अवैध सावकारी धंद्याला आळा बसणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सावकाराच्या जाचाला कंटाळून गेल्या तीन दिवसांपूर्वी विटा – खानापूर रोडवरील सुळकाई रोड येथे संगीता दीनानाथ कवडे (४५) रा. विटा यांनी झाडाला गळफास घेऊन व त्यांच्याच नात्यातील नातेवाईक संदीप महादेव भागवत या तरुणाने अॅसिड पिऊन आपले जीवन संपवले. या परिसरात खासगी सावकारांची संख्या वाढली आहे. शहरातील सोन्या- चांदीचा जोमात चालणारा व्यवसाय, त्यामुळे लोकांकडे येणारा अमाप पैसा यामुळे ज्यादा पैशाचे करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडल्यास नवल नाही. ज्यादा पैसा असेल आणि हा पैसा कुठे गुंतवायचा याबाबत नैतिक ज्ञान नसले की, अवैध धंद्यात गुंतवणूक किंवा खासगी सावकारीचा मार्ग मोकळा होतो. कमी श्रमात ज्यादा पैसा म्हणून अनेक धनदांडगे हा मार्ग निवडतात. या धंद्यासाठी गुन्हेगारी वृत्तीचे लोक सावकारांना बाळगावे लागतात. असे लोक कर्जाचा हफ्त्यांची वसूली करतात.
गळ्यात सोन्याचे मोठे दागिने, हातात सोन्याचे ब्रेसलेट, अंगावर ब्रांडेड कपडे, भारीतले बूट, लक्झरी कार अशा वातावरणात ही मंडळी सभोवताली गर्दी करून राहतात. तसेच अशा लोकांची राजकारण्यांमध्ये ऊठबस असते. त्यामुळे समाजात आपले वजन आहे, असे दाखविण्याचा आटापिटा अशी मंडळी नेहमीच करतात. खासगी सावकारी हा पांढरपेशा धंदा झाला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना कर्ज देण्याचा धंदाही मोठा तेजीत आहे. या धंद्यातून अनेकांनी भरपूर माया जमा केली. खासगी सावकारांबद्दल आणि त्यांच्या दहशतीबद्दल परिसरातील लोक भीती व्यक्त करतात. सावकार राजकारण्यांना वेळप्रसंगी महत्वाचे ठरत असल्यामुळे ही सावकार मंडळी राजाश्रय घेऊनच फिरत असतात. त्यातूनच गुन्हेगारी सुरू होते.
समाजात आता वाईट प्रवृत्तीच्या लोकांना महत्व आल्याने स्टेटस म्हणून अनेकजण गुहेगारीचा आश्रय घेतात, राजकारण्यांशी जवळीक साधतात. धनदांडग्यांच्या सहवासातून ज्यादा पैसा कसा येईल, या मानासिकतेतून शेअर बाजार, सट्टेबाजीत गुंतवणूक केली जाते. काहीजण सावकारी करून पोट भरतात. सावकारी करणे हे आज प्रतिष्ठितपणाचे मानले गेल्याने बहुतेक तरुण तोच धंदा करतात. यासाठी पंटर, दलाल गाठणे, लोकांकडून कर्ज वसुलीसाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जवळ बाळगणे असे प्रकार घडतात. आर. आर. आबा पाटील हे तत्कालीन गृहमंत्री असताना त्यांनी खासगी सावकारीवर वाचक बसवला होता. अशाच प्रयत्नांची आज गरज आहे, असे वाटते. खासगी सावकारीमुळे गुन्हेगारीला बळ मिळते, अनेकांचे जीव जातात त्यामुळे खासगी सावकारीची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असे वाटते.