माळेगाव:
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराचा जोर वाढला आहे. नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मळद येथे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट करत आपली भूमिका ठामपणे मांडली.
पवार म्हणाले, “माझ्या अध्यक्षतेखाली कारभार राबविला गेला, तर कोणतीही गफलत होणार नाही. उलट कारखान्याच्या विकासाला चालना मिळेल. कारखाना सभासदांच्या हितासाठी काम करत राहील, आणि तो मी जिवंत असेपर्यंत सहकारी तत्वावरच चालेल, याची खात्री द्यायला मी आलो आहे.”
पूर्वीच्या कार्यकाळात संचालक मंडळाने दिलेल्या दराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “आज माळेगावइतका ॲडव्हान्स इतर कोणत्याही कारखान्यात दिला जात नाही. ही पारदर्शकता आणि प्रगती मी पुढील पाच वर्षे अधिक व्यापक स्वरूपात दाखवीन.”
अजित पवार यांनी विरोधकांवरही टीका केली. “सभासदांना दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्यांना मी योग्य उत्तर देईन. जेव्हा मी अध्यक्ष असेन, तेव्हा कोणताही निर्णय सभासदांच्या हिताला हानी पोहचवणारा असणार नाही,” असे ते म्हणाले.
“कारखान्याची धुरा मी स्वीकारली असून निर्णयक्षमतेसह कारभार पार पाडेल. एखादा महत्त्वाचा विषय आला, तर मी त्यावर वेळ न घालवता तातडीने निर्णय घेईन,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर प्रचाराला वेगळीच धार मिळाल्याचे दिसत आहे.