पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार ) नेहमीच पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासमवेत स्टेज शेअर करण्याचं टाळतात. मात्र, शरद पवार अजित पवारांसमोर आवर्जून येतात, यापूर्वीही एक-दोनवेळा असे प्रसंग घडले आहेत. आता, पुणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतही शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले होते. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर, राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार हे बैठकीसाठी 5 मिनिटं आधीच सभागृहात आले होते. तर, नंतर आलेल्या अजित पवारांनी दोन खुर्च्या सोडून बसणं पसंत केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळलं होतं. त्यामुळे, पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची पुणे जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता डीपीडीसीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीला खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवारांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर, आजच्या डीपीडीसी बैठकीनिमित्त पवार काका-पुतणे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. तसेच, या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल-जवाब पाहायला मिळाला. तर, शरद पवार यांनीही बारामतीती दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही प्रश्न विचारल्याचं दिसून आलं.