विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांची साताऱ्यात माहिती
सातारा/ प्रतिनिधी-
राज्यातील वातावरण गढूळ असलंतरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दुषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपसभापती गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, उपनेत्या कलाताई शिंदे, सांगली संपर्कप्रमुख सुनीता मोरे, सातारा जिल्हा महिलाप्रमुख शारदा जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते. सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रे अंतर्गत जिल्ह्यातील महिलांचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी आल्यानंतर गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्यावेळी सातारा येथे कार्यक्रमाच्यानिमित्ताने येणे झाले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला संमिश्र यश मिळाले. शिवसेनेचेही सात खासदार निवडूण आले आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीतही युतीला यश मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. याची मदत याच महिन्यात महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांत आत्मविश्वास आला असून उत्साहही निर्माण झालेला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी अर्ज आले आहेत. १५ लाखांच्या आसपासून नामंजूर झाले आहेत, असे सांगून उपसभापती गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ज्या महिलांचे अर्ज बाद झालेत, ते कायमस्वरुपी नाहीत. काही तांत्रिक चुका राहिल्या असतील. तरीही काही महिला या योजनेपासून दूर राहिल्यातरी त्यांना इतर योजनांमधून लाभ देता येऊ शकतो. विधानसभा निवडणुकीपुरतीच ही योजना नाही. कायमस्वरुपी योजना चालणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.