पुणे-
भारतीय अवयव दान दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये अवयव दान या जीवनदायी कृतीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला गेला. दक्षिण कमांडचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ
(अति विशिष्ट सेवा मेडल ) आणि सदर्न स्टार आर्मी वाइव्स वेलफेअर असोसिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्षा कोमल सेठ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने सर्व स्तरातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाला कमांड हॉस्पिटल आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक थोरॅसिक सायन्सेसचे तज्ज्ञ अधिकारी उपस्थित होते, ज्यांनी ब्रेन डेथ सारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. तसेच, अवयव दानाच्या संदर्भातील गैरसमज आणि याबाबतीतल्या अंधश्रद्धांबद्दल चर्चा केली व सशस्त्र दलातील अनेक यशस्वी प्रत्यारोपणाच्या प्रेरणादायी किस्से सांगितले.
पुण्याच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या केंद्रीय समन्वयक आरती गोखले यांनी बीज भाषण केले, ज्यामध्ये जीवन वाचविण्यासाठी आणि असंख्य लोकांना जीवनाची आशा देण्यासाठी अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या भावपूर्ण समारंभात, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि कोमल सेठ यांनी अवयव दात्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या नि:स्वार्थ आणि प्रेरणादायी योगदानासाठी सन्मानित केले. जीवनदान रुपी देणगी दिल्यासाठी या लोकांचे आभार मानण्यात आले आणि त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी, त्यांच्या कुटुंबीयांसह, अवयव दाते होण्याची प्रतिज्ञा घेतली.