5.4 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोलिस म्हणून घरात घुसून व्यापाऱ्यास दाखवला पिस्तुलाचा धाक, कोल्हापुरातील खबळजनक घटना

कोल्हापूर :

पोलिस असल्याचे सांगत आलेल्या अज्ञाताने पिस्तुलाचा धाक दाखवत शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे (वय ५६) आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले. हा प्रकार सोमवारी (दि.१२) रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या दरम्यान घडला. नष्टे यांच्या घरात सुमारे पाऊण तास थरार सुरू होता. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मास्क परिधान केलेल्या अज्ञाताने थेट घरात घुसून पिस्तूल दाखवत दहशत माजवल्याने शाहूपुरीत खळबळ उडाली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी नष्टे हे शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंदाजे सहा फूट उंचीचा, सुमारे ४० वर्षे वयाचा तरुण नष्टे यांच्या दारात आला. संदीप नष्टे यांचेच घर आहे काय? अशी विचारणा करून तो थेट घरात घुसला. त्याच्या अंगात लाल-निळ्या रंगाचा चौकड्याचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट होती. तोंडावर मास्क असल्याने त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता.

पोलिस असल्याचे सांगत तो सोफ्यावर बसला. तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आहे. तुम्ही तडजोड करून प्रकरण मिटवणार आहे, की वाढवणार आहे? अशी त्याने विचारणा केली. बराच वेळ यावरून नष्टे आणि संशयितामध्ये चर्चा सुरू होती. तक्रारीबद्दल सविस्तर माहिती आणि नाव विचारताच त्याने वाद घालायला सुरुवात केली. हा कोणीतरी भामटा असावा, अशा संशय बळवताच नष्टे कुटुंबीयांनी त्याला घरातून बाहेर जायला सांगितले.

त्याचवेळी संशयिताने कमरेेचे पिस्तूल काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले. प्रकरण मिटवले नाही तर तुम्हाला जड जाईल. कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत तो धमकावू लागला. पिस्तूल पाहताच नष्टे कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली. नष्टे यांचे आई, वडील, पत्नी आणि मुलांनी हॉलमध्ये धाव घेतली. गोंधळ वाढताच संशयिताने काढता पाय घेतला.

नेमके कारण काय?
संशयिताने पोलिस ठाण्यातील तक्रारीचा उल्लेख करीत वारंवार तडजोड करण्याचा आग्रह धरला. कोणाचेही नाव न घेता तो केवळ तडजोड करा आणि प्रकरण मिटवा, असे म्हणत होता. हातात पिस्तूल असूनही त्याने कोणाला जखमी केले नाही. त्यामुळे संशयिताचा उद्देश केवळ पैसे काढण्याचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या