कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने देशात पटकाविले ६७ वे स्थान
कराड
भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची एन.आय.आर.एफ. क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट १०० संस्थांच्या यादीत कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाने अव्वल स्थान पटकाविले आहे. फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र शिक्षण संस्था गटाच्या रँकिंगमध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने देशात ६७ वे स्थान पटकाविले आहे.
भारत सरकारचे केंद्रीय शिक्षणमंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांनी राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम सभागृहात नुकतेच देशातील उच्च शैक्षणिक संस्थांचा एन.आय.आर.एफ. रँकिंग अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-२०२४ अहवाल जाहीर केला. भारतातील सर्वोत्कृष्ट उच्चशिक्षण संस्थांच्या मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे ९ वे वर्ष आहे. शिक्षण आणि संसाधने, शोध व व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम आदी मापदंडांच्या आधारे विविध १३ श्रेणींमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली. यामध्ये फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र शिक्षण संस्था श्रेणीमध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने देशात ६७ वे स्थान पटकाविले आहे. देशातल्या सर्वोत्कृष्ट १०० फार्मसी शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रातील १६ संस्थांचा समावेश आहे.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१७ साली कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभाग सुरु करण्यात आला. बी. फार्मसी, ए.फार्मसी, फार्म डी., पी.एचडी. असे विविध अभ्यासक्रम येथे राबविले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त कॅम्पस, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व संशोधनाला प्राधान्य यामुळे ‘कृष्णा’च्या फार्मसी अधिविभागाने अल्पावधीतच उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने हे यश प्राप्त केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असून, भविष्यात फार्मसी विषयातील संशोधनवाढीला चालना देण्याचा आमचा मनोदय आहे. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वोत्कृष्ट १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळविल्याने, आमच्या या प्रयत्नांना बळ मिळाले आहे, असे मत यानिमित्ताने फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव यांनी व्यक्त केले आहे.