कृष्णाकाठ / ashok sutar
महाराणी येसूबाई यांचे स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि संभाजी महाराजांच्या सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई भोसले यांचे संगम माहुली, सातारा येथील स्मारक स्थळ राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. त्याबाबतची अंतिम अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यासंदर्भात सरकारी ठराव (जीआर) सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे. येसुबाईंचे स्मारक निश्चित करण्यास दीर्घ कालावधी लागला. तीनशे वर्षांनंतरही महाराणी येसूबाई भोसलेंची समाधी योग्य स्थितीत आहे. ही समाधी अधिसूचित झाली झाली की राज्य पुरातत्व विभागाकडून २०२६ – २७ च्या अर्थसंकल्पातून समाधीचे सुशोभीकरण व आवश्यक संवर्धनाची कामे करेल, असे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी गतवर्षी म्हटले होते. त्यामुळे समाधीच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
महाराणी येसूबाई फाउंडेशनचे सुहास राजेशिर्के यांनी म्हटले आहे की, मुघल राजा औरंगजेबाच्या ताब्यात १९ वर्षे घालवल्यानंतर, महाराणी येसूबाई १७२९ मध्ये साताऱ्यात आल्या आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या तिथेच राहिल्या. त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती, परंतु जवळजवळ तीनशे वर्षे समाधी दुर्लक्षित राहिली. २०२३ सालापासून, महाराणी येसूबाई फाउंडेशन आणि जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्था यांनी समाधीस्थळावर संशोधन कार्य केले आहे. हे शोधकार्य सुरू केल्यानंतर समाधीस्थळाचे स्थान निश्चित करण्यात आले आणि पुरातत्व विभागाला अहवाल सादर करण्यात आला. महाराणी येसुबाईंचे हे समाधीस्थळ आता राज्य-संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराणी येसुबाईंचा पराक्रम व ऐतिहासिक माहिती सर्वांना ज्ञात होईल.
मे २०२४ मध्ये मी मित्रांसोबत संगम माहुली गावात महाराणी येसुबाईंची समाधी पाहण्यास गेलो होतो. संगम माहुली घाटावर महाराणी येसुबाईंच्या समाधीची चौकशी केली, त्यावेळी काही जणांनाच या समाधीची माहिती होती. संगम माहुली गावाच्या कमानीपाशी प्रवेश करताच डाव्या बाजूला एक मोठा चौथरा आहे. या चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वृंदावन व त्याच्या पाठीमागील बाजूस सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईचा मृत्यू दि. २५ जुलै १७४८ साली झाला. त्यानंतर त्यांच्या समाधीच्या कामास सुरुवात झाली. या समाधीच्या पुढील बाजूस उजव्या हाताला कृष्णा- वेण्णामाईची रथशाळा आहे. याला लागूनच पाठीमागील बाजूस पूर्वाभिमुख एक अवाढव्य बांधकाम दिसते. एका चौरस चौथऱ्यावर अष्टकोनी आकारात हे बांधकाम आहे. त्याच्या चारही बाजूस गोलाकार दगडी खांबांनी ते सुशोभित केले आहे. ही वास्तू रथशाळा व आजूबाजूला वाढलेल्या वस्तीमुळे लवकर लक्षात येत नाही. या वास्तूचा चौथरा राजचिन्हांनी सजवलेला असून, अतिशय देखण्या स्थापत्यशैलीत तिचे बांधकाम करण्यात आले आहे. समाधीस्थळाचे क्षेत्रफळ ४६. ४५ चौरस मीटर आहे. समाधीच्या पूर्व बाजूला आनंदराव भोसले यांचे घर आहे. पश्चिम बाजूला संगम माऊली गावठाण परिसर आहे. उत्तर बाजूला आनंदराव भोसले यांची मोकळी जागा आहे. दक्षिण बाजूला कृष्णाबाई रथयात्रा शेड असून अंतर्गत रस्त्याच्या बाजूला महाराणी येसुबाईंचे समाधी मंदिर आहे. महाराणी येसुबाईंच्या समाधीचे दर्शन घेताच येसुबाईंनी स्वराज्यासाठी केलेला त्याग आठवला आणि डोळे भरून आले.
काळाच्या ओघात समाधीवरील घुमटाचे थोडे नुकसान झाले आहे. येसुबाईंच्या समाधीस्थळाला एक वर्षांपूर्वी जेव्हा भेट दिली त्यावेळी समाधी स्थळावर फरशी बसवलेली नव्हती. जवळपास तीनशे वर्षानंतरही दगडात बांधलेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. २००५ मध्ये जिज्ञासा मंचाने महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे अवशेष शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमेस सातारचे माजी नगराध्यक्ष दिवंगत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाठबळ लाभले होते. माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात महाराणी येसुबाईंच्या समाधीचा नामोल्लेख आढळून आला. परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, तसेच माहुलीच्या हरिनारायण मठाची कागदपत्रे याच्या आधारावर शोध घेण्याचे काम सुरु होते. अखेर महाराणी येसुबाईंच्या समाधीस्थळाचा शोध हरिनारायण मठाची जुने दस्तावेज, नकाशांचा आधार यांद्वारे घेण्यात आला. येसूबाईंच्या समाधीचा शोध घेण्याचे काम काही ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी केले होते. त्यात इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचे नाव घ्यावे लागेल. इ.स. १७२९ च्यादरम्यान महाराणी येसुबाईंचे साताऱ्यात निधन झाले. त्यानंतरच्या काळात त्यांची घुमटी (समाधी) माहुली येथे बांधण्यात आली, असा उल्लेख सापडतो; परंतु पुढच्या जवळपास तीनशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात राजघराण्यातील इतर समाध्यांप्रमाणेच या समाधीचे स्थानदेखील विस्मृतीत गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंनंतर येसुबाईंना, स्वराज्याचे कुलमुख्त्यारपद ( न्यायाच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकणारी ) दिले गेले. छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाई राणीसाहेबांना स्वत:ची श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर महाराणी येसुबाईंनी युवराज राजाराम यांना स्वराज्याचा छत्रपती घोषित केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाईंनी ८ महिने रायगड किल्ला लढवला. छत्रपती शाहूराजे त्यांच्या सुटकेच्या अटींचे पालन करतात याची खात्री करण्यासाठी मुघलांनी महाराणी येसूबाईंना बंदिवासात ठेवले. त्या २९ वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. यादरम्यान महाराष्ट्र व दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्या बंदिवासात होत्या. मुघलांच्या कैदेत तिच्याकडे फारसी भाषेतील येसूबाई वलिदा-ए-साहू या नावाची एक नाममुद्रा होती .छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता येसूबाई इतरांशी गुप्तपणे पत्रांद्वारे संपर्कात होते ज्याचा पुरावा इतिहासात उपलब्ध आहे. १७१९ मध्ये जेव्हा मराठे छत्रपती शाहू महाराज हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मजबूत झाले तेव्हा महाराणी येसुबाईंची सुटका झाली.