1.5 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

गुन्हेगारीवर अंकुश ठेवा

अग्रलेख / १७ जानेवारी २०२५

गुन्हेगारीवर अंकुश ठेवा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. लोकशाहीच्या नियमाप्रमाणे महायुतीला राज्यातील जनतेने सत्तेचा कौल दिला आहे. नवे सरकार स्थापन झाले त्यावेळी मुंबईत आझाद मैदानावर मोठा सोहळा आयोजित केला होता. महायुतीतील सहभागी पक्षांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्यासाठी अनेक समर्थकांना बोलावले होते. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित होईल असे वाटले होते. पण अचानक परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडून हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये कायद्याचा पदवीधर तरुणाचा पोलिसांच्या कैदेत मृत्यू झाला. त्याला मारहाण झाली होती. नंतर बीड येथील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही खंडणीखोरांनी निर्घृण हत्या केली. बीड येथील घटनेत राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा मित्र सहभागी आहे. यावरून विरोधक आणि सरकारमधील मंत्र्यांची जुंपली. वाल्मिक कराड याचे नाव राज्यात त्यामुळे कुप्रसिद्ध झाले. अजूनही या प्रकरणाचा गुंता सुटलेला नाही. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीडमधील मंडळी असल्यामुळे पवारांना बीडमधील राष्ट्रवादी कार्यकारिणी बरखास्त करावी लागली. असो. जसे पेरावे तसे उगवते. एकूण राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर बसल्यापासून अस्थैर्य माजले आहे, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असेच दिसते.

राज्यातील गृहमंत्री स्वत: मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आहेत. परंतु त्यांना आपल्याच जवळच्या लोकांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्यांवर अंकुश ठेवता येत नसल्याचे दिसते. नुकतीच मुंबईत एक घटना घडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे ? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खानवरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर, वर्षा गायकवाड यांनीही या हल्ल्यानंतर राज्य सरकारच्या गृह विभागाला लक्ष्य केले आहे. तसेच, सामान्यांच्या सुरक्षेचे काय असा सवालही उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजी सरकारच्या गृह मंत्रालयाला लक्ष्य केले आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सेलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही. नाना पटोले यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद लावणार्‍या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. बीडमधील प्रकरणात सीआयडी चौकशी लावली आहे, त्या पथकातील बरेचसे अधिकारी व कर्मचारी गुन्हेगाराच्या जवळचे आहेत. म्हणजेच राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. तसेच गतवेळी फडणवीसांच्या कार्यकाळात भाजपा नेत्याने एखाद्यावर संशय व्यक्त केला तरी त्याची इडी अथवा सीआयडी चौकशी लागायची. तो विरोधक दोन- तीन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर निर्दोष मुक्त व्हायचा. आता महायुतीतील नेत्यांच्या जवळचे गुन्हेगार एखाद्या प्रकरणात अडकले आणि त्यांच्याबद्दल पुरावे असूनही राजी सरकारचे गृह खाते धिम्म असल्याचे दिसते. हा पक्षपातीपणा नव्हे का ? असा प्रश्न सरकारला विचारावासा वाटतो. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उगाच म्हटलेले नाही.

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तिसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून खासगी सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुद्धा असुरक्षित असतील तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय, असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. राज्यातील गृहमंत्र्यांनी वेळीच जागे होऊन पारदर्शक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे असे वाटते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या