कृष्णाकाठ /अशोक सुतार
मुंबई टोरेस गुंतवणूक घोटाळा
जास्त आमिषाला बळी पडून ग्राहकांची फसवणूक !
आत्तापर्यंत अनेक बड्या कंपन्या मुंबईत व्यापारासाठी आल्या, त्यांनी लोकांना उच्च परताव्याचे आमिष दाखवले आणि मुंबईतून गाशा गुंडाळून निघून गेल्या. यातील काही कंपनया मल्टीलेवल मार्केटिंग करत होत्या, तर काही कंपन्यांनी हाऊसिंग फायनान्स, तर काही बँकाही होत्या. लोकांना जास्त रक्कमेच्या परताव्याचे आमिष दाखवत लोकांना फसवण्याचा धंदा आता तेजीत सुरू आहे. मुंबईत अशा प्रकारची एक मल्टिलेवल कंपनी आता पोलिसांच्या ऐरणीवर आली आहे. गुंतवणूकदारांची अंदाजे १००० कोटी रुपयांची फसवणूक करणार्या टोरेस ज्वेलर्सचे पितळ पोलिसांनी उघडे पाडले आहे. मुंबई पोलिसांनी टोरेस या ज्वेलरी स्टोअरवर पॉन्झी आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनांच्या मिश्रणाद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोंदवलेल्या एफआयआरनुसार अंदाजे १,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी टोरेस घोटाळ्यातील हवाला ऑपरेटर अल्पेशला अटक केली असून २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
——————————————————————————————
एप्रिल २०२३ मध्ये स्थापन झालेल्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबईत टोरेस या नावाने शाखा स्थापन करीत ग्राहकांना जास्त रकमेची प्रलोभने दाखवत कोट्यवधी रुपयांना चुना लावला आहे. झुकते है सब, झुकानेवाला चाहिए या म्हणीप्रमाणे या कंपनीने प्रशस्त कार्यालये, विविध प्रलोभने दाखवत मध्यम व उच्च वर्ग आपल्याकडे आकर्षित केला. मुंबई परिसरात सहा ठिकाणी शोरूम असलेले टोरेस हे दागिने दुकान आहे, ज्यावर गुंतवणूकदारांना उच्च परतावा देणाऱ्या गुंतवणूक संधी देऊ केल्याचा आणि नंतर त्यांना फसवल्याचा आरोप आहे. ही कंपनी मुंबईतील दादर, ग्रँट रोड आणि कांदिवली, ठाण्यातील कल्याण, नवी मुंबईतील सानपाडा आणि पालघरमधील मीरा रोड येथे शोरूमसह टोरेस चालवत होती. कंपनीने लोकांना दागिने, प्रामुख्याने मॉइसनाइट दगड ( अमेरिकन हिरे ) खरेदी करून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले आणि ग्राहकांना आकर्षित केले. याप्रकरणी गुन्हे शाखा कसून तपास करत असून तपासातून नवीन बाबींचा उलगडा होत आहे. तपास सुरू होऊन सुमारे पंधरा दिवस उलटले आहे. टोरेस प्रकरणातील फसवणुकीची रक्कम ८३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी १० जानेवारी रोजी टोरेस पोंझी योजना प्रकरणात सहा ठिकाणी छापे टाकले आणि सुमारे ३ कोटी रुपये आणि कथित गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित विविध गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली. कंपनीच्या ग्राहकांना जेव्हा समजले की, आपण नागवलो गेलो आहोत, त्यावेळी ग्राहकांत अस्वस्थता पसरली. पोलिसांनी ६६ वेगवेगळ्या गुंतवणूकदारांविरुद्ध १३.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अंदाजे १.२५ लाख लोकांनी त्यांचे पैसे गुंतवले असतील आणि एकूण १,००० कोटी रुपये गमावले असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने लोकांना दागिने, प्रामुख्याने मॉइसनाइट दगड (अमेरिकन हिरे) खरेदी करून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले आणि एका आठवड्यासाठी ३-७ टक्के दरम्यान आठवड्याचे व्याज मिळवले. सुरुवातीला, गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी, कंपनी नियमितपणे गुंतवणूकदारांना आश्वासन दिलेले परतावे देत असे. त्यांनी गुंतवणूकदारांना नफा पुन्हा गुंतवण्यास देखील प्रेरित केले.
टोरेस कंपनीची कार्यपद्धती
टोरेस कंपनीची मुख्य कार्यपद्धती पॉन्झी योजना आणि बहु-स्तरीय मार्केटिंगचे मिश्रण अशी होती. पॉन्झी योजनेत, लोकांना उच्च परताव्यांची आश्वासने दिली जातात आणि सुरुवातीला, गुन्हेगार अधिक लोकांना आकर्षित करतात म्हणून ते दिले जातात. अशा प्रकारे, नवीन लोकांकडून मिळालेले पैसे फसवणूक टिकवून ठेवण्यासाठी वापरले जातात. एमएलएम मार्केटिंगमध्ये देखील, योजना उत्पादने विकून जलद पैसे मिळवण्याचे आश्वासन देतात, परंतु ते प्रामुख्याने नवीन सदस्यांच्या नोंदणीवर अवलंबून असते. नवीन सदस्यांकडून शुल्क घेतले जाते आणि उच्च-स्तरीय लोकांना सर्वात मोठी कपात मिळते.
टोरेस घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने अल्पेश घारा या हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. तो फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विदेशात पाठवण्याचे काम करीत होता. अल्पेशला २१ जानेवारीपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये टोरेस नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला..
टोरेस कंपनीच्या ग्राहकांना गुंतवणुकीवर दर आठवड्याला ११ टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केल्यानंतर अचानक कंपनीचे सर्व शोरूम बंद झाले. पोलिसांनी कंपनीच्या तीन वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना अटकही केली. पण या सगळ्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे कंपनीचे दोन संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को हे युक्रेनला पसार झाले आहेत. टोरेसने सुरुवातीला मुंबई शहरात मोठे सेमिनार्स घेतले. त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्यांचे आमिष दाखवून आकर्षित करण्यात आले. कंपनीकडून दर आठवड्याला २ टक्के व्याज परताव्यासह सोन्यात गुंतवणूक, ३ टक्के व्याज परताव्यासह चांदीमध्ये गुंतवणूक, ४ टक्के व्याज परताव्यासह मेझेनाईट स्टोनमध्ये गुंतवणूक आणि फक्त मोझेनाईट खड्यांमध्ये गुंतवणूक केल्यास ५ ते ६ टक्के व्याजदर परतावा मिळेल असे ग्राहकांना सांगण्यात आले. हळूहळू टोरेसने गुंतवणुकीवरील व्याजदर परतावा वाढवला. त्यामुळे अधिकाधिक लोक योजनांमध्ये गुंतवणूक करू लागले. पैशांच्या स्वरूपात गुंतवणूक केली तर लोकांना आठवड्याला थेट ११ टक्के व्याजदर परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याशिवाय जर कुठल्या गुंतवणूकदाराने नवीन गुंतवणूकदार कंपनीकडे आणले, तर त्या व्यक्तीला २० टक्के व्याजदर परतावा मिळेल, असे कंपनीने सांगितल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे.
आतापर्यंत एक लाख २५ हजार गुंतवणूकदारांना सुमारे १००० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोरेस या पाँझी स्कॅम्सची हाताळणी युक्रेन येथील लोक करीत असल्याचे उघडकीस आले होते. आता या घोटाळ्यातील सर्व सर्व्हर यंत्रणा देखील परदेशातून हाताळली जात असल्याचे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे.
गुप्तवार्ता युनिट सुरू करण्याचा पोलिसांचा निर्णय
टोरेस घोटाळ्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेचे गुप्तवार्ता (इंटेलिजन्स) युनिट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्यांचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.
श्रीलंकेत कार्यालये सुरू करण्याचा कंपनीचा विचार
टोरेस ज्वेलरी कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींचा श्रीलंकेत देखील आपली कार्यालये सुरू करण्याचा विचार होता, असे पोलिसांना तपासादरम्यान समजले आहे. टॉरेस ज्वेलरी चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांसह तीन आरोपींना ७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. कंपनीचे सीईओ तौसिफ रियाझ उर्फ जॉन कार्टर (33)( भारतीय नागरिक) आणि युक्रेनियन नागरिक असलेल्या ओलेना स्टोयन (33) यांनी तेथे कार्यालय सुरू करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेला भेट दिली होती अशी माहिती उघड झाली आहे.