कृष्णाकाठ 20jan2025 / अशोक सुतार
कुंभमेळ्यानिमित्त…
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा झाली धनी ।।१।।
अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरी बोडी डोई दाढी ।।२।।
बोडिलें ते निघालें । काय पालटलें सांग वहिलें ।।३।।
पाप गेल्याची खुण । नाहीं पालटले अवगुण ।।४।।
भक्तिभावें विण । तुका म्हणे अवघा सीण ।।५।।
(८८. अभंग क्र. २८७०)
संत तुकाराम महाराज यांनी कुंभमेळ्याचे साडेतीनशे वर्षांपूर्वी किती स्पष्ट वर्णन केले आहे. याचा अर्थ असा, सिंहस्थ पर्वणी आली आणि न्हावी व भटांची मौज झाली. अंत:करणात पापाचा कचरा आहे आणि वरवर दाढी आणि डोके बोडतो. बोडले ते निघाले पण मनात काय बदल झाला ? पाप नष्ट झाले काय ? अवगुण तर गेले नाहीत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीशिवाय कर्मकांड करणे म्हणजे स्वत: चे विचार न बदलता, शरीराला कष्ट देण्यासारखे आहे.
——————————————————————————————–
देशात दर तीन वर्षानी एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षात अलाहाबाद (प्रयागराज ) , उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण कुंभमेळे भरतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयागला अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनी अलाहाबादला महाकुंभमेळा भरतो. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्याला लाखोंच्या, करोडोंच्या संख्येने भाविक जमतात. तिथे विशिष्ट मुहूर्तावर, विशिष्ट कुंडात स्नान केले तर सर्व पापे धुवून जातात,असा लोकांचा समज आहे. कुंभमेळ्यात लोक दाढीचे, डोक्याचे केस काढतात. पुजाऱ्यांमार्फत अभिषेक, अनुष्ठाने केली जातात. ही सर्व कर्मकांडे करताना भाविकांचे धन वाया जाते, भट- नाभीकांचे फावते आणि कर्मकांड करून ईश्वर प्रसन्न होत नाही, दुसरे काही साध्य होत नाही.
कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो साधू एकत्र येतात. कुंभमेळ्यादरम्यान साधू एकत्र येऊनही तेथील वातावरण प्रसन्न, पवित्र, मंगल असेलच असे नाही. कुंभमेळ्यातील मिरवणूकीतील क्रमांकावरुन वा स्नान आधी कोणी करायचे यावर साधुंमध्ये त्रिशूळाने मारामारी, एकमेकांना भोसकले असे गैरप्रकार घडतात. स्वत: साधु म्हणवणारे जर आपसांत मानपानावरून भांडत असतील, रक्तपात करत असतील तर मग ते साधु कसले ? दया, क्षमा, शांती ही साधुची लक्षणे साधूंमध्येच दिसत नसतील तर साधू कुणाला म्हणावे असा प्रश्न पडतो. काही साधू अर्धनग्न राहतात, अंगाला राख फासतात, कपाळी गंध रेखतात, भगवे कपडे वापरतात, गळ्यात माळा, कानात मुद्रा घालतात म्हणून त्यांना साधु म्हणायचे का ? तीर्थात आंघोळ केल्याने पाप नाहीसे होते म्हणतात. गंगेत स्नान नाही केले तर आपले पाप धुवून जाणार नाही, याची साधूंना का भीती वाटावी ?
कुंभमेळ्यात डोक्यावरचे केस कापले तर षडरिपू नष्ट कसे होतील ? याचा विज्ञाननिष्ठ पद्धतीने विचार का केला जात नाही ? संतशिरोमणी नामदेव महाराज सांगतात, पाप जाये अनुतापें । तीर्थात नुसती आंघोळ होते. खरेतर हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप झाला तरच पाप नाहीसे होते. जगद्गुरू तुकाराम महाराज लोकांना रोकडा सवाल करतात की, ‘जाऊनिया तीर्था काय तुवा केले । चर्म प्रक्षाळिले वरी वरी ।। अंतरीचे शुद्ध कासयाने जाले । भुषण त्वा केले आपणया ।।‘ असे सांगून महाराज पुढे म्हणतात की, ‘तुका म्हणे तीर्थजळी । काऊळे चिमण्या का न नहाती ।। ‘ याचा अर्थ, कावळे, चिमण्याही त्या तीर्थात नहातात, मासे-खेकडे-बेडके-कासवे यांचे तर नदी हे वसतीस्थान आहे. मग त्यांना मोक्ष कसा मिळत नाही ?
गंगा नदीत कुंभमेळ्यादरम्यान लाखो लोक स्नान करतात. केंद्र सरकारने गंगा शुद्धीकरण विषयावर हजारो कोटी रुपये खर्च करण्याच्या घोषणा केल्या. पण गंगा शुद्ध झालीच नाही. गंगेच्या काठावरील हजारो शहर – गावांचे सांडपाणी वहात गंगेला जाऊन मिळते. नदीखालच्या गावांतील भाविक तेच पाणी पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतात. तर दूरचे भाविक गंगा नदीतील पाणी गंगातीर्थ म्हणून बाटलीत भरुन आणतात. ज्या नद्यांकाठी पूर्वज, ऋषीमुनींनी आपली संस्कृती जपली, त्या नद्या आज शेवटच्या घटका मोजत आहेत. याचे कारण मानवाने पर्यावरणाचा नाश करण्यास सुरुवात केली आहे.
जिथे लाखो भाविकांचा कुंभमेळा भरतो, तिथे नदीच्या पाण्यात मानवी मुत्राचे प्रमाण चारशे, पाचशे पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. पर्यावरण तज्ज्ञ ओरडून सांगतात, प्रदूषण करू नका. पण धार्मिक विधी, सणांच्या निमित्ताने प्रदूषण केले जाते. कुंभमेळ्यात विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी स्नान केले म्हणजे पापे धुतली जातात, पुण्य लाभते असे म्हटले जाते. विशिष्ट वेळ, विशिष्ट काळ. विशिष्ट पर्वणी संत तुकाराम महाराजांना मान्य नाही. तुका म्हणे, हरीच्या दासा । शुभ काळ अवघ्या दिशा ।। संत तुकाराम महाराज स्पष्ट शब्दांत म्हणतात की, सर्व काळ शुभ असतो, सर्व दिशा शुभ असतात.
शुभ– शकुनांसारख्या भ्रामक गोष्टींच्या नादी लागून श्रम, धन व्यर्थ गमावणे तुकाराम महाराजांना मान्य नाही. प्रामाणिकपणे राहावे, नीतीने वागावे, दु:खिकष्टीतांसाठी झटावे , दीन – दलितांच्या सेवेसाठी वेळ घालवावा, समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून वागावे हेच मानवी मूल्याने जगण्याचे सूत्र आहे. पुण्य मिळवण्यासाठी कोणतेही कर्मकांड करायची गरज नाही, ‘पुण्य परउपकार । पाप ते परपिडा ।।‘ असा तुकाराम महाराजांनी संदेश दिला आहे. हा संदेश आचरणात आणणे हे आपले आध्यात्मिक व सामाजिक कर्तव्य आहे.