कृष्णाकाठ/ दि. 21जानेवारी 2025 /अशोक सुतार
पालक मंत्रीपदावर एकनाथ शिंदेंचा वरचष्मा !
पालक मंत्री पदाच्या वाटपामध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच छाप दिसत आहे. राज्यात भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त आहे, पण राज्य सरकारकडून शिवसेना शिंदे गटाने मुश्किलीने काही पालक मंत्री पदे आपल्या हाती घेतल्याचे दिसत आहे. अनेक जिल्ह्यांत पालकमंत्री पदावरून महायुतीमधील पक्षांमध्ये मतभेद विकोपाला गेले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील मंत्री वा आमदारांना पालक मंत्रिपद मिळण्यासाठी पराकाष्ठा केल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ असा की, राज्य सरकारमध्ये शिंदे गटाच्या शब्दाला वजन आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांच्याकडेच सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री पद ठेवले आहे.
———————————————————————————-
राज्य सरकारने सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री पदाचे नावे जाहीर केली नव्हती. दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे नुकतीच दि. १८ जानेवारी रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहेत. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळाले. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नव्हती. अनेक ठिकाणी पालकमंत्री पदाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी जनतेतून नाही तर महायुतीमधील राजकीय पक्षांमध्ये आहे. त्यावरून महायुतीत एकवाक्यता नसल्याची चर्चा होत आहे. असो. राज्यात भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त आहे, परंतु पालक मंत्री पदाच्या वाटपामध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच छाप दिसत आहे. एकनाथ शिंदे हे उप मुख्यमंत्री असले तरी लाडकी बहीण योजनेमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रभर पसरले आहे. शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्याला पालक मंत्रिपद मिळावे म्हणून जंग जंग पछाडले आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्य सरकारने नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने एक पत्रक जारी करून नुकताच हा निर्णय घेतला आहे. सरकारला हा निर्णय घेण्यास कुणी बाध्य केले ? हा प्रश्न उरतोच. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जिल्ह्यात म्हणजे सातारा जिल्ह्यातही पालकमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्ह्यात चार आमदार भाजपचे आहेत. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे. असे असताना सातारा जिल्ह्याचे पालक मंत्रिपद पाटणचे आमदार शंभुराजे देसाईकडे आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने राज्य सरकारकडे पालक मंत्री पदाच्या वाटपाबाबत दिलेल्या तक्रारीची दाखल घेत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद नुकतेच स्थगित केले आहे. तसे पत्रकच जारी केले आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नाशिक येथील शालेय शिक्षणमंत्री मंत्री दादा भुसे आणि रायगड जिल्ह्यातील मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती. दादा भुसे यांच्या ऐवजी जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना पालक मंत्री पद राज्य सरकारने दिले होते. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही राज्य सरकारने तटकरे यांना पालक मंत्री पद देण्याचा निर्णय घेतला होता हे विशेष होय. शिवसेनेचे मंत्री भारत गोगावले यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली होती. गोगावले यांच्या समर्थकांनी मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांची खंबीर भूमिका कारणीभूत आहे, असे वाटते.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्वीपासूनच राजकीय वाद आहेत. २०२२ मध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद कारणीभूत ठरले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता. त्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना आमदारांनी मिळू दिले नव्हते. दोन वर्षे रत्नागिरीच्याच उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते.
एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्हयात भाजपचे ४ आमदार अतुलबाबा भोसले, मनोज घोरपडे, शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आहेत. तर शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार शंभुराजे देसाई व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार महेश शिंदे हे आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांच्याकडेच सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री पद ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांचा पालकमंत्री पदावर वरचष्मा असल्याचे यातून दिसून येते.