spot_img
spot_img
spot_img
spot_img

उंब्रजमध्ये काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात हल्लाबोल; पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन

उंब्रज, प्रतिनिधी :-

पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि. २२ रोजी सकाळी १० वाजता उंब्रज येथील पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!” अशा घोषणांनी वातावरण चांगलेच तापले. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा हा देशहितासाठी नसून उद्योगपती अदानी यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसते. अदानी यांना नॉर्वेमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यात आणि प्रसिद्धी मिळविण्यात सरकार व्यस्त आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “या सरकारची धोरणे सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविली जात आहेत. परदेश दौरे करून किंवा मोठमोठ्या घोषणा देऊन देशाची प्रतिष्ठा वाढत नाही. लोकहिताचे निर्णय आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना केल्या तरच जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाते. केवळ स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवून घेतल्याने कोणी विश्वगुरू होत नाही.”
या आंदोलनात अजित पाटील चिखलीकर, अमित जाधव यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने इंधन दरवाढ आणि महागाईवर तातडीने नियंत्रण आणावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ झालेल्या या आंदोलनामुळे उंब्रज परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील काँग्रेसचा आक्रमक सूर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या