मनसेचा आक्षेप, पोलिसांकडे नवी मागणी
पुणे : –
सध्या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची दुसरी फळी आक्रमक झाली असून विविध आंदोलने, मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवार असतील, आमदार आदित्य ठाकरे असतील किंवा मनसेच्या (MNS) विद्यार्थी सेनेनचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) असतील हे तिन्ही नेते सध्या लोकांमध्ये जाऊन विविध प्रश्नांवर, त्यांच्या समस्यांवर भाष्य करत आहेत. अध्यक्ष अमित ठाकरे यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत आला. कारण, पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला. त्यानंतर, त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र, या दाखल गुन्ह्यातील FIR प्रतमध्ये (Pune) वापरलेल्या हिंदी शब्दांना मनसेनं आक्षेप घेतला आहे.
अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावल्याचे निदर्शनास आणून दिले. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. त्यानंतर, याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, या दाखल गुन्ह्याच्या FIR मध्ये हिंदी शब्दांचा वापर करण्यात आल्याने मनेसनं आक्षेप नोंदवला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रतिमध्ये मराठीचे वावडे का? असा सवाल मनसेनं विचारलाय. एफआयआरच्या प्रतीमध्ये ‘वडील का नाम’ असा शब्दप्रयोग करण्यात आलाय, त्यावरून मनसेनं पोलिसांच्या प्रतिवर टीका केली. तसेच, अमित ठाकरे यांच्यावर पुणे प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या प्रतित अर्धे हिंदी आणि अर्धे मराठी शब्द आहेत. त्यामुळे, हा काय प्रकार? ही कोणती अशुद्ध भाषा महाराष्ट्र पोलिस वापरत आहेत? महाराष्ट्र सरकारचे कामकाज हे मराठीमध्ये होणे अपेक्षित असताना “वडील का नाम” हे असे अभद्र लेखन का केले जात आहे? असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय.





