मुंबई/प्रतिनिधी : –
निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. मात्र, अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा भाजपच्या इशाऱ्यावर चालत असून महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळेच सत्तेवर आले असल्याचा घणाघाती हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मुंबई येथे गांधी भवन या काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांतील 100 च्या वर उमेदवारांनी हाय कोर्टात याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला असून त्यानुसारच सर्वांनी याचिका दाखल केली आहे.
लोकसभेच्या निकालावेळी काही आरोप केले नाहीत, तर आताच का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2019 ते 2024 च्या लोकसभा निवडणूक पर्यंत 5 लाख मतदार वाढले. परंतु, त्यानंतर फक्त सहाच महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपर्यंत 48 लाख अधिक मतदार वाढले कसे? याला कोण जबाबदार? असे अचानक वाढलेले मतदार निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळेच निवडणूक प्रक्रियेवरच आमचा संशय असल्याने याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठीच याचिका दाखल केली. तसेच आज मतदार दिनानिमित्त पत्रकार परिषदेतून काही महत्वाचे मुद्दे आम्ही मांडल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे व फडणवीसांच्या दावोसमधील कराराची श्वेतपत्रिका काढा
खरोखरच महाराष्ट्र सरकारने 16 लाख कोटींचे जर करार केले असतील, तर त्यांचे अभिनंदनच आहे. सामंजस्य करार होतात. पण त्याचे पुढे काहीच होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्या 16 लाख कोटींचे करार केलेल्या 80 टक्के कंपन्या या महाराष्ट्रातीलच आहेत. मग फोटोसाठी फक्त दावोसला जाऊन करार दाखवून काय साध्य केले आहे? अशा प्रकारामुळे बेरोजगार युवकांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला गेले होते. त्यावेळी जे करार केले गेले, त्याची सद्य परिस्थिती काय आहे? किती लोकांना त्यामधून रोजगार दिले गेले? यांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यातील कराराची एक श्वेतपत्रिका काढली गेली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले.