कृष्णाकाठ / दि. 27 मार्च2025 / अशोक सुतार
वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद
गेल्या काही दिवसांपासून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज, रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला नुकतेच दिले आहे. त्यामुळे सर्वत्र वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच आहे. तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल इतिहासात चुकूनही उल्लेख नाही. पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे म्हटले आहे की, वाघ्या कुत्र्याचे स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. त्यामुळे हा वादग्रस्त वाघ्या कुत्रा होता का ? त्याचे स्मारक कसे उभारले गेले ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. यापूर्वी अनेकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीचा संदर्भ दिला. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे, मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवले होते, त्याची मांडणी तिथे केली.
वाघ्या कुत्र्याचे स्मारक १९३६ ला पूर्ण झाले. २०३६ पर्यंत ते स्मारक काढले नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्व खात्याने दिली आहे. त्यामुळे हा विषय संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आहे. या विषयाला इतिहासकारांनी न्याय देण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्याने त्यात उडी घेतली होती. परंतु या घटनेच्या समर्थनार्थ कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. १९२५ ला छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार होण्यापूर्वीची काही छायाचित्र पुरातत्व खात्याकडे उपलब्ध आहेत. १९२६ ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती. त्या समितीने स्मारकाचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्यावेळी पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले होते. तत्कालीन सरकारने पाच हजार रुपये दिले होते. तेव्हा अनेक शिवभक्तांनीही स्मारकासाठी मदत केली होती. त्यातून शिवरायांचे स्मारक पूर्ण झाले आहे.
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत अनेक वाद निर्माण झाले होते आणि आहेत. एकाही इतिहासकाराने वाघयाच्या समाधीला दुजोरा दिलेला नाही किंवा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असल्याचा दाखला दिलेला नाही. वाघ्या कुत्र्याची दंतकथा नाटककार राम गणेश गडकरीलिखित ‘राजसंन्यास’ या नाटकातून निर्माण झाली. सदर नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. या नाटकाच्या प्रेरणेतून‘वाघ्या कुत्र्याचे स्मारक’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बांधण्यात आले. गडकरी हे इतिहासकार नव्हते, त्यांनी लिहिलेले ‘राजसंन्यास’ हे नाटक कल्पित होते.
वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून इतिहासाशी संबंधित वादाला नवे तोंड फुटले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ मार्च रोजी एक पत्र लिहून, हा पुतळा ३१ मेपूर्वी हटवावा अशी मागणी केली आहे. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कथित सदस्यांनी निषेध म्हणून वाघ्याचा पुतळा काढून टाकला होता; परंतु नंतर तो पुन्हा बसवण्यात आला. संभाजी ब्रिगेडने रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारी असलेल्या वाघ्याच्या पुतळ्याविरुद्ध निदर्शने आणि हल्ला केला होता. वाघ्याच्या स्मरणार्थ, १९०६ मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी दिलेल्या देणगीतून रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ एक स्मारक बांधण्यात आले, त्यांनी कुत्र्याच्या पुतळ्यासाठी ५,००० रुपये दिले होते.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे कपोलकल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये वाघ्या कुत्र्याची नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचे स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता.
राजसंन्यास नाटकाच्या अर्पणपत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. तिथूनच वाघ्या कुत्र्याची कथा जन्माला आली. राजसंन्यास हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक असून या नाटकाची अर्पण पत्रिका रायगड येथे कोरण्यात आली आहे, असेही इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणी विरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. अहिल्यादेवीच्या जयंतीची तारीख निवडून महाराष्ट्रात दंगल घडवायची का ? राज्यात छत्रपतींनी असंतोष पसरवण्याचे काम करु नये, तसेच वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे. होळकर यांनी जिर्णोद्धार केला म्हणून हा मुद्दा पुढे घेवून आलात का? असा सवाल देखील बाळासाहेब दोडतले यांनी विचारला आहे. श्री क्षेत्र माहुली येथे खंड्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा कसा ? असा सवाल बाळासाहेब दोडतले यांनी विचारला आहे. तसेच वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याचा दावाही धनगर समाजाच्या नेत्यांनी दिल्यामुळे हा वाद वाढणार असल्याचे दिसते.