कराड/प्रतिनिधी : –
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंढे (ता. कराड) येथे धाड टाकून बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक केली आहे. तसेच या नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी करण बापू कांबळे (वय 29) सध्या रा. मुंढे, मूळ रा. किवळ, ता. कराड याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलाल सलाल उद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख आणि नसरिन अब्दुलसालाय मोल्ला (मूळ रा. बांगलादेश) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले असून, त्याबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भारत-बांगलादेश सीमेवरून अधिकृत परवानगीशिवाय घुसखोरी करून हे नागरिक काही महिन्यांपूर्वी भारतात आले होते. ते कराडलगतच्या मुंढे येथील ‘सह्याद्री रेसिडेन्सी’ या इमारतीत सुमारे सहा महिन्यांपासून राहत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांद्वारे पोलिसांना मिळाली होती.
या पार्श्वभूमीवर कराडच्या पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. संबंधित ठिकाणी छापा टाकून संशयितांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.
चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, संबंधितांनी मुंबई येथे बनावट पत्त्यावर आधारकार्ड तयार करून घेतल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या अनुषंगाने स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडमधील ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करीत आहेत.





